ऑडिओ क्लिपमुळे राजस्थानमध्ये खळबळ, काँग्रेसकडून 2 आमदारांवर कारवाई

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राजस्थानमध्ये राज्य सरकारवरील अस्थिरतेचं संकट अद्यापही कायम असून रोज नाट्यमय घडामोडी घडत आहेत. याचदरम्यान एका ऑडिओ क्लिपमुळे राजस्थानमधील राजकारणात खळबळ उडाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत जयपूरमधील भाजपा नेते संजय जैन यांच्या मार्फत काँग्रेस आमदार भवरलाल शर्मा यांच्या संपर्कात असल्याचा दावा आहे. काँग्रेसने या ऑडिओ क्लिपची दखल घेतली असून आमदार विश्वेंद्र सिंह आणि भवरलाल शर्मा यांचे काँग्रेस पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व रद्द केले आहे.

ऑडिओ क्लिप प्रसारमाध्यमांमधून समोर आली. यामध्ये केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, भाजपा नेते संजय जैन आणि काँग्रेस आमदार भवरलाल शर्मा राजस्थान सरकारमधील आमदारांसंबंधी बोलत आहेत. संजय जैन आणि भवरलाल शर्मा यांच्यावरही गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे. आमदारांना देण्यासाठी काळा पैसा कुठून आणला याचाही तपास झाला पाहिजे, अशी मागणी रणदीप सूरजेवाला यांनी केली आहे.

रणदीप सूरजेवाला यांनी ऑडिओ क्लिपसंबंधी बोलताना केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्यावर जोरदार टीका केली. राजस्थानमधील सरकार पाडण्याच्या षडयंत्रात सहभागी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्यावर स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपकडून एफआयर दाखल केला पाहिजे. गरज लागल्यास त्यांना अटकही करावी. दिल्लीत बसून राजस्थानमध्ये आमदारांचा घोडेबाजार कोण करते आहे हे समोर आलेच पाहिजे, अशी मागणी यावेळी सूरजेवाला यांनी केली आहे.