सचिन पायलटच्या ’घरवापसी’ मागे मुंबईच्या नेत्यांचा ‘हात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राजस्थानमध्ये गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंड पुकारले होते. पण, अखेर आता त्यांनी माघार घेत पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या घरवापसीमागे मुंबईतील दोन नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

काँग्रेसमध्ये काल अचानक घडामोडींनी वेग आला. सचिन पायलट समर्थकांनी प्रियांका गांधी यांची भेट घेत प्रस्ताव मांडला. त्यानंतर पायलट यांनी राहुल गांधी यांची भेट घेउन चर्चा केली. चर्चेनंतर वादावर अखेर पडदा पडला. पक्षाच्या वरिष्ठांनीही तातडीने निर्णय घेत पायलट यांच्या घरवापसीला हिरवा कंदील दिला आहे. त्यांच्या घरवापसीसाठी मुंबईतील काँग्रेसचे नेते दीपेंद्र हुडा, भंवर जितेंद्र सिंह, मिलिंद देवरा आणि जितिन प्रसाद यांचा प्रयत्नाला खास यश मिळाले आहे. सचिन पायलट यांनी एक पाऊल पुढे टाकल्यानंतर काँग्रेसमधील या युवा ब्रिगेडने मोठ्या नेत्यांची मनधरणी करण्यात यश मिळवले. ही युवा नेत्यांची आणि राहुल गांधींचे निकटवर्तीय असलेल्या नेत्यांची टीम गुप्तपणे पायलट यांच्या संपर्कात होती.

दीपेंद्र हुडा हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय आहे. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर पायलट यांच्या परतीला होकार मिळाला. त्यानंतर हुडा आणि भंवर जितेंद्र सिंह यांनी पायलट यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर वेणुगोपाल आणि अहमद पटेल यांनीही तडजोडीसाठी प्रस्ताव साद केला.