पायलट यांच्यावर कारवाई होताच भाजप ‘सक्रिय’, तर गेहलोतांनी लावली ‘फिल्डिंग’

जयपूर : वृत्तसंस्था – राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकवल्यावर सचिन पायलट यांची अनेकांकडून मनधरणी करण्यात आली. मात्र, सचिन पायलट आपल्या मागण्यांवर ठाण असल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून काँग्रेसने त्यांना उपमुख्यमंत्रीपदावरून हटवले. तसेच त्यांना प्रदेशाध्यक्षपदावरूनही हटवण्यात आले. काँग्रेसने सचिन पायलट यांच्यावर कारवाई केल्यानंतर आता भाजप सक्रीय झाले आहे.


राजस्थानमध्ये राजकीय भूकंप घडवण्यासाठी सचिन पायलट यांनी बंड पुकारले आणि आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. गेहलोत यांना मुख्यमंत्री पदावारून हटवावे अशी मागणी पायलट यांनी केली. मात्र, काँग्रेसने जुन्या जाणत्या आणि अनुभवी असलेल्या अशोक गेहलोत यांच्यावर विश्वास दाखवत सचिन पायलट यांच्यावर कारवाई केली. सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री पदावरून हटवले. तसेच त्यांच्या समर्थक तीन आमदारांची मंत्रीपद देखील काँग्रेसने काढून घेतली.

काँग्रेसने सचिन पायलट यांच्यावर कारवाई करताच भाजपने बैठक बोलावली आहे. भाजपच्या प्रदेश कार्यालयात ही बैठक होत असून या बैठकीला प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया, राष्ट्रीय संघटन मंत्री वी. सतीश, गुलाबचंद कटारिया, उपनेता प्रतिपक्ष राजेंद्र आणि प्रदेश संघटन महामंत्री चंद्रशेखर उपस्थित आहेत. या बैठकीमध्ये विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मागण्यावर चर्चा होत आहे. तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष ओम माथुर हे दिल्लीवरून जयपूरला रवाना झाले आहे.

भजपची बैठक सुरू असताना दुसरीकडे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आधीच फिल्डिंग लावून ठेवली आहे. त्यांनी 105 आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. सचिन पायलट यांच्यावर कारवाई होताच गेहलोत हे राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा यांची भेट घेण्यासाठी राजभवनावर पोहचले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार राजभवनात काँग्रेसच्या आमदारांची परेड होण्याची शक्यता आहे. राजभवनावर गेहलोत पोहचले असून ते आमदारांच्या समर्थनाचे पत्र राजपालांकडे सोपवणार आहेत. यानंतर राज्यपाल काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.