अशोक गहलोत यांना ‘गुन्हेगार’ सांगत गांधी कुटुंबाला पुन्हा जोडण्याच्या प्रयत्नात सचिन पायलट

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय गोंधळात सचिन पायलट यांच्या एका वक्तव्यावरून असे वाटत आहे की, ते पुन्हा एकदा गांधी कुटुंबाशी संपर्क पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत आहेत. राजस्थानच्या उपमुख्यमंत्री पदावरून आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष पदावरून काढून टाकल्यानंतर दुसर्‍या दिवशी म्हणजे बुधवारी सचिन पायलट यांनी म्हटले की, – ’मी आजही काँग्रेसचाच आहे’. पायलट यांनी यासोबत जोर देत म्हटले की, भाजपामध्ये जाणार असल्याच्या वावड्या या जाणीवपूर्वक उठवण्यात आल्या, गांधी कुटुंबाशी असलेले नाते बिघडवण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे.

पीटीआयला पायलट यांनी सांगितले की, राजस्थानचे काही नेते पार्टी हायकमांड समोर त्यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. सचिन पायलट यांचे हे वक्तव्य अशावेळी आले आहे जेव्हा काँग्रेसने पक्षविरोधी कारवाया केल्याने त्यांच्यावर अ‍ॅक्शन घेण्यास सुरूवात केली आहे. काँग्रेसने पायलट यांना एक कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे, ज्यामध्ये त्यांना विचरण्यात आले आहे की, आमदार म्हणून तुम्हाला अयोग्य का घोषित करण्यात येऊ नये? यासंबंधी उत्तर देण्यासाठी पायलट यांना 17 जुलैपर्यंत वेळ देण्यात आला आहे. परंतु, यापूर्वीच काँग्रेसने पायलट यांना सर्व पदांवरून हटवले आहे. दरम्यान, एक गोष्ट महत्वाची आहे की, पायलट यांनी भाजपामध्ये जाण्याबाबत कोणतीही घोषणा अद्याप केलेली नाही.

काँग्रेसने काढून घेतली सर्व पदे
काँग्रेस एकीकडे सचिन पायलट यांच्याकडे उत्तर मागत आहे तर दुसरीकडे पक्षाने सचिन पायलट यांचे राजस्थानचे उपमुख्यमंत्री पद आणि पदेशाध्यक्ष पद काढून घेतले आहे. काँग्रेसच्या निर्णयानंतर पायलट यांनी आपली प्रतिक्रिया जाहीर करत ट्विट केले की, ’सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं’.

अजूनही काही तरी होऊ शकते!
तर काँग्रेस महासचिव आणि राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे यांनी म्हटले की, जर राज्याचे माजी उप मुख्यमंत्री सचिन पायलट आपल्या चूकांसाठी माफी मागितली तर काही तरी होऊ शकते, परंतु प्रत्येक गोष्टीसाठी एक कालमर्यादा असते.

एका पाठोपाठ एक झटके
गृह विभागाच्या सूत्रांनुसार राज्य सरकार सचिन पायलट यांची झेड श्रेणी सुरक्षा सुद्धा काढून घेऊ शकते. उच्चस्तरावर याबाबत विचार सुरू आहे. मात्र, अंतिम निर्णय मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या अध्यक्षते खाली स्थापन केलेली कमिटी घेणार आहे. कमेटीच्या शिफारशीनुसार विभाग झेड सुरक्षा काढून घेईल.