एकाच मुलीवर जडला दोन भावांचा जीव अन्…

कोटाः पोलीसनामा ऑनलाईन – एकाच मुलीवर प्रेम जडलेल्या दोघा चुलत भावंडांनी धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यात घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी मोबाईलवर एक व्हिडीओ रेकॉर्ड केला असून त्यात मुलीसाठी योग्य जोडीदार शोधा आणि तिचे लग्न लावून द्या असे म्हटले आहे.

देवराज गुर्जर (वय 23) आणि महेंद्र गुर्जर (वय 23. दोघेही रा. केशवपुरा ) अशी आत्महत्या केलेल्या चुलत भावंडाची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, केशवपुरा येथे राहणा-या देवराज आणि महेंद्र दोघेही एकाच मुलीच्या प्रेमात होते. त्यांच्या हातावर आशा असे नाव आढळून आले आहे. दोघांचे मृतदेह दिल्ली-मुंबईला जोडणाऱ्या रेल्वे रुळांजवळ छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी दोघांनीही त्यांच्या मोबाईलवर एक व्हिडीओ रेकॉर्ड केला. आम्ही उचलणार असलेल्या पावलासाठी आमच्यावर कोणीही कोणत्याही प्रकारचा दबाव आणलेला नाही, असे दोघांनी या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. तसेच मी उचलेल्या पावलासाठी त्याला आणि त्यानं उचलेल्या पावलासाठी मला जबाबदार धरू नये, असे आवाहनही त्यांनी व्हिडीओतून केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे. शवविच्छेदन केल्यानंतर दोघांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केले आहेत.