संतापजनक ! 13 वर्षीय विद्यार्थिनीवर 10 शिक्षकांनी केला बलात्कार

अलवर : वृत्तसंस्था – सामूहिक बलात्काराच्या घटनेने राजस्थानमधील अलवर हादरले आहे. सहावीत शिकणाऱ्या एका 13 वर्षाच्या मुलीवर शाळेतीलच 10 शिक्षकांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत कुणाकडे वाच्यता केली तर, कुटंबीयांना ठार मारण्याची धमकी आरोपी शिक्षकांनी पीडित मुलीला दिली होती. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
अलवर जिल्ह्यातील नारायणपूर परिसरात एका 13 वर्षीय विद्यार्थिनीवर तिच्याच शाळेतील दहा शिक्षकांनी सामूहिक बलात्कार केल्याचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर खळबळ माजली आहे. पीडित मुलीने पोलीस ठाण्यात शिक्षकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी पॉस्को अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून सहपोलीस अधीक्षक शैलेंद्र इदोलिया यांच्याकडे तपास सोपवला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक तेजस्विनी गौतम यांनी पीडितेची भेट घेतली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले.

पोलिसांनी पीडितेला रुग्णालयात नेऊन वैद्यकीय चाचणी केली आहे. तिचा जबाब नोंदवून घेतला आहे. नारायणपूर पोलीस ठाण्याचे प्रमुख सुरेश सिंह यांनी सांगितले, की नारायणपूर परिसरातील एका शाळेत इयत्ता सहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर शाळेतीलच दहा शिक्षकांनी बलात्कार केल्याप्रकरणी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच शाळेतील तीन शिक्षिकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या शिक्षकांनी दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीचे पालक शाळेचा दाखला घेऊन शाळेत गेले होते. मात्र, शिक्षक मुलीच्या घरी गेले आणि तिला शाळेत येऊन दाखला घेऊन जाण्यास सांगितले. घरी अचानक आलेल्या शिक्षकांना पाहून मुलगी जोरजोरात रडू लागली. पालकांनी मुलीला याबाबत विचारलं, त्यावेळी तिनं आपल्यावर झालेल्या अत्याचाराबाबत माहिती दिली.

कुटुंबीय मुलीला घेऊन नारायणपूर पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी शाळेच्या संचालकांसह 8-10 शिक्षकांविरोधात तक्रार दाखल केली. वडीलांनी सांगितले की, माझी मुलगी इयत्ता तिसरीपासून या शाळेत शिकत आहे. 20 जुलै रोजी शाळेतील शिक्षक सतीश शर्मा याने मुलीला धमकावले आणि शाळेचा दाखला घेऊन जाण्यास सांगितले. तसेच भेट घेण्यास सांगितले. 23 जुलै रोजी शाळेचे व्यवस्थापक आणि सतीश शर्मा हे घरी आले. दाखला घेण्यासाठी मुलीला शाळेत पाठवा असे त्यांनी सांगितले. त्यांना पाहून मुलगी रडू लागली. मुलीने शाळेत जाण्यास नकार दिला. तिला विचारलं असता, तिने घडलेला सर्व प्रकार सांगित्याचे वडिलांनी सांगितले.