भाजपात प्रवेशासाठी 35 कोटींची ‘ऑफर’ दिल्याच्या आरोपानंतर सचिन पायलट ‘आक्रमक’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राजस्थानमध्ये बंडाचा झेंडा हाती घेऊन सरकारवर अस्थिरतेचे संकट निर्माण करणार्‍या सचिन पायलट यांनी काँग्रेस आमदार गिरीराज सिंह मलिंगा यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. गिरीराज यांनी सचिन पायलट यांच्यावर गंभीर आरोप केले असून भाजपात प्रवेश कऱण्यासाठी आपल्याला 35 कोटींची ऑफर दिल्याचा दावा केला आहे. गिरीराज यांनी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत खोटे आरोप केल्याप्रकरणी सचिन पायलट यांनी ही नोटीस पाठवली आहे.

काँग्रेस आमदार गिरीराज मलिंगा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, माझी सचिन पायलट यांच्याशी चर्चा झाली. ते माझ्याशी बोलले आणि किती पैसे हवे आहेत अशी विचारणा केली. त्यांनी मला 35 कोटींची ऑफर दिली. हे डिसेंबरपासून सुरु असून यात काही नवीन नाही. मला हे शक्य नाही असे स्पष्ट सांगितले आहे.

सचिन पायलट आणि माझे दोन ते तीन वेळा बोलणे झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे गिरीराज यांच्या आरोपानंतर सचिन पालयट आकृमक झाले असून त्यांनी आरोप खोडून काढले आहेत. त्यानुसार पायलट यांनी गिरीराज यांना कायदेशीर नोटीसही पाठविली आहे. यावरुन राजस्थानातील राजकीय अस्थिरता अजूनही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.