राहुल गांधींच्या ‘त्या’ निरोपामुळं सचिन पायलट यांचे बंड झाले ‘थंड’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानातील सत्ता संघर्ष कायम आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी बोलावलेल्या बैठकीला काँग्रेसचे बहुसंख्य आमदार उपस्थित राहिले. यामुळे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचं बंड मोडीत निघाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पण बैठकीला अनुपस्थित राहिलेले काँग्रेसचे किमान 19 आमदार नेमकं काय करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. काँग्रेस आमदारांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी त्यांच्याकडे 109 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. गेहलोत आमदारांसोबत माध्यमांसमोर आले आणि त्यांनी व्हिक्टरीचं चिन्ह दाखवत सरकार टिकणार असल्याचे सूचित केलं.

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील वादावर काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी दोन्ही नेत्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला.

राहुल गांधी यांनी रणदीप सुरजेवाला यांच्या फोनवरून अशोक गेहलोत यांच्याशी चर्चा केली. तसंच दुसरीकडे सचिन पायलट हे सकाळपासून राहुल गांधी यांच्या संपर्कात होते. सचिन पायलट यांनी कोणताही मोठा निर्णय घेऊ नये, त्यांना परत यावं, त्यांना सन्मानाने पक्षात स्थान दिले जाईल, असा निरोप देण्यात आला आहे. तर प्रियंका गांधी यांनीही मध्यस्थी करून दोन्ही नेत्यांशी संवाद साधला.

दरम्यान, अजय माकन यांनी काँग्रेसकडे 109 आमदारांचा पाठिंबा आहे. आम्ही हा अहवाल सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना पाठवला आहे. गेहलोत सरकार स्थिर आहे. बहुमत सिद्ध करेल आणि गेहलोत यांच्या नेतृत्वावर केंद्रीय नेतृत्वाचा विश्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. तसेच बंडखोर नेत्यांशीही सहानुभूती पूर्वक वागले पाहिजे असे निर्देश राहुल गांधी यांनी दिले असल्याची माहिती माकन यांनी दिली.