देवदर्शनाला निघालेल्या 3 नवदाम्पत्याचा गाडीला अपघात, 7 ठार तर 10 गंभीर जखमी

चितौडगडः पोलीसनामा ऑनलाईन – नवविवाहित दाम्पत्याचा नवा संसार सुरू होण्याआधीच काळाने घाला घातला. आठवडाभरापूर्वीच लग्न झालेले तीन दाम्पत्य देव दर्शनाला निघाले असताना वाटेतच झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 10 जण गंभीर जखमी आहेत. राजस्थानमधील चित्तौडगड जिल्ह्यात रात्री उशिरा हा भीषण अपघात झाला. जखमीना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील रतलामच्या अख्याकला गावातील 18 लोक क्रूझरमधून चित्तौडगड, सावळियाजी या प्रसिद्ध मंदिरात दर्शनाला निघाले होते. त्यात तीन नवीन विवाहित जोडपे होते. ज्यांचे एका आठवड्यापूर्वी लग्न झाले होते. त्यावेळी त्यांचे वाहन उदयपूर निंबाहेरा रस्त्यावर सादुलखेडाजवळ आल्यानंतर क्रूझर आणि ट्रकची भीषण धडक झाली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य तीन जणांचा रुग्णालयात घेऊन जाताना वाटेतच मृत्यू झाला. तर 10 जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी गाड्या हटवल्या आहेत. तर जखमींना जवळच्या स्थानिक रुग्णालयात दाखल केले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून अहवालानंतर पुढचा तपास करण्यात येणार आहे.