संतापजनक ! पतीसमोर विवाहितेवर बलात्कार, 5 जणांवर FIR दाखल

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   एका महिलेवर तिच्या पतीसमोरच घटस्फोटीत नवऱ्याच्या भावाने बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार राजस्थानात घडला आहे. महिला तिच्या कुटुंबासोबत घरी जाताना आरोपीने चौघांच्या मदतीने हे कृत्य केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांवर गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.

पोलीस उपायुक्त योगेंद्र सिंह यांनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानातील बारण जिल्ह्यात ही घटना घडली आहे. पीडित महिला दुसऱ्या पतीसह मुलगा आणि लहान बहिणीसह शनिवारी रात्री घरी जात होत्या. त्यावेळी छाजवर गावाजवळ तिच्या घटस्फोटीत नवऱ्याच्या भावासह चौघांनी तिला अडवले आणि तिच्या कुटुंबियांना शेतात नेले. त्यानंतर तिच्या नवऱ्यावर हल्ला करून त्याचे हातपाय दोरीने बांधले. त्यानंतर पतीसमोरच आरोपीने महिलेवर बलात्कार केला. घटनेनंतर महिला पतीसह लहान मुल आणि बहिणीला घेऊन कशीबशी मुख्य रस्त्यावर येऊन प्रवाशांना मदत मागितली. प्रवाशांनी याबद्दलची माहिती पोलिसांना फोन करून दिली. पीडितेची रविवारी वैद्यकीय तपासणी करून तिचा जबाब नोंदविण्यात आला आहे. बलात्कार करणाऱ्या आरोपीसह दोघांना अटक केली आहे. मुल होत नसल्याने पीडित महिला तिच्या पहिल्या पतीपासून विभक्त झाली होती. त्यानंतर महिलेन पारंपरिक रुढी असलेल्या नाटा प्रथेनुसार दुसर लग्न केले होते.