Sharad Pawar : ‘महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला’

पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसचे दिग्गज नेते आणि राज्यसभेतील खासदार राजीव सातव यांचे रविवारी (दि. 16) पहाटे पुण्यात निधन झाले. त्यांच्या निधनाने कॉंग्रेसवर शोककळा पसरली आहे. सातव यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही ट्विट करून शोकभावना व्यक्त केल्या आहेत. सातव यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली, असे पवारांनी म्हटले आहे.

काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील तरुण, तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. गुजरातमधील निवडणुकीत काँग्रेसने सोपवलेली प्रभारीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत पक्षाला चांगले यश मिळवून देण्याची भूमिका त्यांनी पार पाडली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाल्याचे पवारांनी म्हटले आहे. दरम्यान सातव यांच्या निधनानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी श्रध्दांजली वाहिली आहे.

कॉंग्रेस नेते राजीवजी सातव यांचे निधन झाले. ही आम्हा सर्वांसाठी अतिशय दुःखद बातमी आहे. त्यांनी कोरोनाला जोरदार झुंज दिली. पण ही झुंज अपयशी ठरली. ते एक उत्तम संसदपटू तर होतेच याशिवाय ते माणुसकी जपणारे नेते होते. त्यांच्या अकाली जाण्यामुळे महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे. लोकशाही, धर्मनिरपेक्षता व समतेच्या मूल्यांवर श्रद्धा असणारा व त्यासाठी संघर्ष करणारा एक तरुण नेता आहे पण गमावला. या कठीण यावेळी आम्ही सर्वजण सातव कुटुंबियांसमवेत आहोत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे म्हणत सुळे यांनी दुःख व्यक्त केले आहे.