राजेंद्र गावित यांची उमेदवारी धोक्यात ? अपक्ष उमेदवाराने घेतला आक्षेप

पालघर : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपमधून शिवसेनेत आलेल्या राजेंद्र गावितांना शिवसेनेने पालघर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. मात्र, त्यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. गावित यांच्या उमेदवारी अर्जावर काँग्रेसचे माजी खासदार दामू शिंगडा यांचे चिरंजीव आणि अपक्ष उमेदवार सचिन शिंगडा यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांच्या आक्षेपानंतर छाननी प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

पालघर लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबत मागील काही शासकीय निवासस्थानांची थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र उमेदवारी अर्जासोबत जोडले नसल्याची हरकत सचिन शिंगडा अपक्ष उमेदवार यांनी घेतली आहे. या हरकतीवर निवडणूक निर्णय अधिकारी लवकरच निर्णय देतील.

राजेंद्र गावित हे गतवर्षी झालेल्या पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर निवडून आले होते. दरम्यान, बदललेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कमळा ऐवजी धनुष्यबाण हातात घेऊन शिवसेनेची उमेदवारी मिळवली आहे.