NCP च्या ‘या’ नेत्याच शरद पवारांना ‘आव्हान’ ?

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळेल या आशेने अनेक दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. तर काही नेत्यांचे तळ्यातमळ्यात आहे. अशातच नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावीत यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना आव्हान दिले आहे. गावीत यांनी शहादा येथील कार्यकर्ता मेळाव्यात ज्या पक्षातून तिकीट मिळेल त्या पक्षात जाण्याचा इशारा शरद पवारांना दिला आहे. त्यामुळे नंदुरबारमध्ये राष्ट्रवादीला भगदाड पडण्याची शक्यता आहे.

मागील विधानसभा निवडणुकीमध्ये राजेंद्र गावीत यांनी शहदा-तळोदा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वाटाघाटीमध्ये नंदुरबारमधील चारही मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. नंदुरबारमध्ये दोन काँग्रेसचे आमदार असून राजेंद्र गावीत यांनी शहादा-तळोदा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली आहे.

2014 च्या निवडणुकीमध्ये शहादा-तळोदा मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या मतांचे विभाजन झाल्याने या ठिकाणी भाजपचा विजय झाला होता. राजेंद्र गावीत यांना विजयी उमेदवारापेक्षा 11 हजार 590 मते कमी पडली होती. गावीत हे तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती तर काँग्रेसच्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेस पक्षाला हा मतदारसंघ सुटण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीला हा मतदारसंघ सुटला नाही तर राजेंद्र गावीत बंडखोरी करण्याच्या पवित्र्यात असल्याचे बोलले जात आहे.

राजेंद्र गावीत आणि शरद गावीत यांनी अक्कलकुवा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्याची मागणी केली आहे. मात्र, काँग्रेस नंदूरबार मतदार संघ सोडण्याच्या तयारीत आहेत. परंतु या ठिकाणी राजेंद्र गावीत आणि शरद गावीत यांचे मोठे बंधू विजयकुमार गावीत हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे घरगुती वाद टाळण्यासाठी राष्ट्रवादी या ठिकाणी लढण्यास तयार नाही. त्यातच आज राजेंद्र गावीत यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत, जो पक्ष आपली काळजी घेईल, आपल्याला तिकीट देईल त्या पक्षात प्रवेश करणार असल्याची भुमिका घेतली आहे.

Visit : policenama.com