वाद पेटला ; राजेंद्र राऊत आणि संजय शिंदेंच्यात झाली फोनवर खडाजंगी

बार्शी : पोलीसनामा ऑनलाईन – बार्शी तालुक्याचे माजी आमदार राजेंद्र राऊत आणि संजय शिंदे यांच्यात फोन वरून चांगलीच खडाजंगी झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईमध्ये भेटून राजेंद्र राऊत बार्शीला जात असताना त्यांना संजय शिंदे यांचे सारखेच फोन येत होते. मंगळवारी रात्री पुण्यात मुक्कामी आल्यावर राजेंद्र राऊत यांनी संजय शिंदे यांचा फोन उचलला. तेव्हा झालेल्या बोलण्यातून दोघांमध्ये वादाला तोंड फुटले.

राजेंद्र राऊत हे सध्या भाजपमध्ये आहेत. त्यांनी शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश केल्यावर संजय शिंदे यांना सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद मिळवून देण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली. त्यानंतर मागील काही दिवसापूर्वी संजय शिंदे यांनी राष्ट्रवादीत उडी घेऊन लोकसभा निवडणूकीचा प्रचार करण्याला सुरुवात केली आहे. राजेंद्र राऊत भाजपमध्ये राहून देखील आपलेच सख्ये मित्र आहेत असा संजय शिंदे यांचा समज होता. म्हणून संजय शिंदे यांनी राजेंद्र राऊत यांना फोन लावून राजाभाऊ ‘तुम्ही कशाला कुटाणे करताय’ असे म्हणले त्यावर राजेंद्र राऊत यांनी संजय शिंदे यांच्यावर चांगलाच राग काढला आहे.

तुला जिल्ह्याचा नेता बनवायला आम्ही कोणाकोणाचा रोष पत्करला आहे हे आम्हालाच माहीत आहे. गद्दारीची पण एक सीमा असते, तू आम्हाला मुख्यमंत्र्यांसमोर तोंडघशी पाडलं आहे. त्यामुळे निवडणूकीत होणाऱ्या परिणामाला तयार रहा. असे राजेंद्र राऊत संजय शिंदे यांना म्हणाले आहेत. त्याच प्रमाणे माढा मतदारसंघात संजय शिंदे यांचा पराभव घडवून आणण्यासाठी राजेंद्र राऊत भाजपचा जोरदार प्रचार करणार आहेत. तसेच संजय शिंदे यांचा आपल्याला फोन आल्याची माहिती राजेंद्र राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोनवरून दिली आहे.