आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि खा. सुप्रिया सुळेंनी केलं रक्तदान, नागरिकांना देखील केलं आवाहन

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रुग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई भासत आहे. तसंच, कोरोना विरोधाच्या लढाईत राज्यातील डॉक्टर्स, पोलीस, आरोग्य कर्मचारी आपले योगदान देत आहेत. या लढाईसाठी आवश्यक औषधे, सुविधांची कमतरता भासू नये यासाठी शासनस्तरावरुन सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परंतु , राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा कमी असल्यानं रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याकरिता राज्यातील जनतेने स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावं, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

राज्यात पाच ते सहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यानंतर राज्यात जाणवणाऱ्या रक्त तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर स्वत: राजेश टोपे आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे रक्तदान केलं. दरम्यान, महाराष्ट्रातील ३४४ रक्तपेढ्यांमध्ये १९ हजार ०५९ रक्ताच्या युनिट आणि प्लेटलेटच्या २ हजार ५८३ युनिट आणि मुंबईतील ५८ रक्तपेढ्यांमध्ये ३ हजार २३९ रक्ताच्या युनिट आणि ६११ प्लेटलेट युनिट उपलब्ध आहेत. केवळ ५ ते ७ दिवस पुरेल एवढाच हा साठा आहे.

या पार्श्वभुमीवर येत्या काळात रक्ताचा तुटवडा भासू नये, यासाठी राज्यातील राजकीय, धार्मिक, सामाजिक संस्था व गृहनिर्माण सोसायटी यांनी कोरोनाविषयक काळजी घेऊन छोट्या- छोट्या रक्तदान शिबीरांचे आयोजन करावं . स्वैच्छिक रक्तदात्यांनी देखील नजीकच्या रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान करावं . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तपेढ्यांमार्फत आवश्यक त्या तपासणी चाचण्या व प्रतिबंधक उपाययोजना करुन रक्त संकलन करण्यात येणार आहे. कोरोनाच्या काळात रुग्णांना जीवनदान देण्याकरिता सर्वांनी पुढे येऊन दर तीन महिन्यांनी रक्तदान करावं, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.