सुप्रिया सुळे मध्यरात्री पोहोचल्या राजेश टोपेंच्या भेटीला

पोलिसनामा ऑनलाईन टीम – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई टोपे यांचे काल वयाच्या 74 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. कोरोनाशी मैदानात लढा देणारे टोपे यांच्या मातोश्री शारदाताई यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह राष्ट्रवादीवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मध्यरात्री हॉस्पिटलमध्ये जाऊन टोपे यांचे सांत्वन केले.

शारदाताईंवर गेल्या महिनाभरापासून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मार्चमध्ये देखील त्या महिनाभर दाखल होत्या. बरे झाल्यानंतर त्या दोन महिने घरीच होत्या. मात्र, पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दाखल करण्यात आले होते. काल रात्री नऊच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. याची माहिती मिळताच मुंबईत रात्री हॉस्पिटलमध्ये जाऊन खासदार सुप्रिया सुळे आणि संदानंद सुळे यांनी राजेश टोपे यांच्या मातोश्री यांच्या पार्थिंव दर्शन घेतले.

पहाटे 3 ते 4 च्या सुमारास शारदाताईंचे पार्थिव मुंबईतून जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यात अंतिम संस्कारासाठी नेण्यात आले. शारदाताई कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखान्याच्या अध्यक्ष होत्या, त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, सुन, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर आज सायंकाळी 4 वाजता पार्थपूर ता. अंबड जि. जालना या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.