मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केले निर्णयाचे स्वागत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी भर पडत असताना रुग्णांना आवश्यक असलेले रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवू लागला. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांना इंजेक्शनसाठी पळापळ करावी लागत आहे. तसेच इंजेक्शनचा काळाबाजार सुरु झाला असून पोलिसांनी यावर कारवाई देखील केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने रेमडेसिव्हीर इंजेक्शनची निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्वागत केले आहे.

रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या तुटवड्यामुळे केंद्र सरकारने त्याची निर्यात थांबवण्याचा जो निर्णय घेतला आहे तो स्वागतार्ह आहे. त्यामुळे गरजू रुग्णांना वेळेवर रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध होण्यास मदत होणार आहे, असा विश्वास राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात रेमडेसिव्हिरचा तुटवडा लक्षात घेऊन या इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी आणावी, अशी मागणी राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली होती.

राजेश टोपे यांनी दोन ट्विट केले आहेत. दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी रेमडेसिव्हिर उत्पादकांची बैठक घेतली होती. त्यावेळी निर्यात थांबवण्याच्या मुद्यावर चर्चा करण्यात आली होती. आज केंद्रातील मोदी सरकारने निर्यात थांबवण्याचा निर्णय जाहीर केल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा मिळाला आहे, असेही राजेश टोपे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

राज्यातील 120 पैकी 70 लसीकरण सेंटर्स बंद

राज्यात लसींच्या कमतरतेबाबत बोलताना राजेश टोपे म्हणाले, देशात सर्वाधिक लसीकरण महाराष्ट्रात झाले आहे. महाराष्ट्रात लसीकरणाचा वेग सर्वाधिक आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्याला 1 कोटी 60 लाख लसींची गरज असताना केवळ 1 कोटी 04 लाख लसींचा पुरवठा केला गेला आहे. सध्या राज्यामध्ये 120 सेंटर्स असून त्यापैकी 70 सेंटर्स लस नसल्याने बंद आहेत. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण केंद्र वाढवण्यात आले आहेत. अनेक सुविधा असूनही लोकांना लस देणे अशक्य होत असल्याचे टोपे यांनी सांगितले.

त्या तुलनेत महाराष्ट्राला लस मिळाली पाहिजे

केंद्र सरकारकडून सर्वाधिक लसी महाराष्ट्राला दिल्या असल्याचे सांगितले जात आहे. मात्र असे असतानाही लसींच्या कमतरतेच्या तक्रारी आली आहे. यावर बोलताना टोपे यांनी सांगितले की, महाराष्ट्राची तुलना ही राजस्थान किंवा गुजरात या राज्यांसोबत केली जाऊ शकत नाही. लोकसंख्या किंवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राची तुलना लहान राज्यांसोबत होऊ शकत नाही. कारण महाराष्ट्रात कोरोनाच्या सर्वाधिक केसेस आहेत. मात्र, ज्यावेळी देशातील एकूण रुग्णांच्या संख्येपैकी 60 टक्के रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत, तर महाराष्ट्राला सर्वाधिक लस मिळणे आवश्यक आहे.