आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई अंकुशराव टोपे (74) यांचे शनिवारी रात्री दीर्घ आजाराने मुंबईत निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, सुन, नातवंडे असा परिवार आहे.

त्यांच्यावर रविवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता पाथरवाला ता. अंबड जि. जालना या मुळगावी अंत्यसंस्कार होणार आहेत. शारदाताईं टोपे यांच्यावर महिनाभरापासून मुंबईतील बॉम्बे हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. बरे झाल्यानंतर त्या दोन महिने घरीच होत्या. मात्र पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अ‍ॅडमीट केले होते. आज रात्री नऊच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.

राज्यातील कोरोनाची स्थिती हाताळताना आईकडे पूर्णवेळ लक्ष देण्यास राजेश टोपे यांना जमत नव्हते, त्यामुळे सकाळी वेळ काढून आईची भेट घेत असत. मातोश्रींच्या अंत्यसंस्काराबाबत मंत्री टोपे यांनी म्हटले की, कोरोनामुळे राज्यात अंत्यसंस्कारासाठी मर्यादीत उपस्थितीची जी नियमावली केली आहे त्याचे पालन करून अंत्यसंस्कार केले जातील.

दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचेवर आईच्या मृत्यूमुळे दुखाचा डोंगर कोसळला आहे. टोपे यांच्या मातोश्रीच्या निधनाचे वृत्त कळताच अनेक मान्यवरांनी त्यांचे सांत्वन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोपे यांच्या मातोश्रींना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी म्हटले, शारदाताई यांचे निधन हा आमच्या सर्वांसाठी मोठा धक्का आहे. मी आदरणीय शारदाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. स्वर्गीय शारदाताई यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना.