मी आणि माझी पत्नी जिवंत आहे साहेब…पेन्शन मिळवून द्या, जेष्ठ दाम्पत्याने मांडली कैफियत

राजगड : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशच्या राजगडमधून हैराण करणारे एक प्रकरण समोर आले आहे. येथे एका ज्येष्ठ पती-पत्नीला कागदावर मृत दाखवून त्यांची पेन्शन बंद करण्यात आली. ही वृद्ध व्यक्ती स्वत: आणि पत्नी जिवंत असल्याचे सिद्ध करण्यासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहे. या ज्येष्ठाने एसडीएमकडे कैफियत मांडली की, मी आणि माझी पत्नी आम्ही जिवंत आहोत साहेब, मला माझी पेन्शन मिळवून द्या.

हे विचित्र प्रकरण राजगड जिल्ह्याच्या ब्यावरा जनपद तालुक्यातील बैलास गावात घडले आहे. येथे राहणारे ज्येष्ठ नागरिक बद्रीलाल सोंधिया आणि त्यांची पत्नी सौरम बाई यांना प्रशासनाने मृत घोषित करून सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत मिळणारी वृद्धावस्था पेन्शन बंद केली. चार महिन्यापर्यंत जेव्हा वृद्ध बद्रीलाल आणि त्यांची पत्नी सौरम बाई यांना पेन्शनची रक्कम मिळाली नाही तेव्हा, याचे कारण जाणून घेण्यासाठी ते जनपद पंचायतच्या ब्यावरा येथे पोहचले. त्यांनी आपली समस्या सांगितली की, मला आणि माझ्या पत्नीला 4 महिन्यांपासून पेन्शन मिळत नाही. आम्ही पोट कसे भरणार.

यावेळी जनपद पंचायतीच्या कर्मचार्‍याने पेन्शन बंद होण्याचे कारण सांगितले की, तुमचे आणि तुमच्या पत्नीचे निधन झाल्याने पेन्शन बंद केली आहे. हे ऐकून बद्रीलाल हैराण झाले. पोर्टलवर 15 नोव्हेंबर 2020 ला पती बद्रीलाल आणि सौरम बाई यांना मृत घोषीत करून त्यांची पेन्शन बंद करण्यात आली होती. आता हे वृद्ध दाम्पत्य आपण जीवंत असल्याचे सिद्ध करण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये फेर्‍या मारत आहे. परंतु, आजूनही त्यांची पेन्शन पुन्हा सुरू झालेली नाही.

मात्र, आता पीडित वृद्धाने ब्यावरा एसडीएम कार्यालयात जाऊन एसडीएम निधी सिंह यांच्याकडे तक्रार करत म्हटले की, साहेब मी आणि माझी पत्नी जिवंत आहोत, आम्हाला पेन्शन द्यायला सांगा. यावर एसडीएमने पीडितांना लवकर पेन्शन सुरू करून निष्काळजीपणा करणार्‍यांवर कारवाई करण्यास सांगितले आहे. त्यांनी म्हटले की, या ज्येष्ठ दाम्पत्याला मृत घोषीत केले आहे. हे प्रकरण बेलास गावातील आहे, नुकतेच मला समजले आहे. मी याची चौकशी सुरू केली आहे. लवकरच प्रकरण मार्गी लावले जाईल. असे का झाले, ज्यांनी केले असेल त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल.