सुपरस्टार रजनीकांत यांची मोठी घोषणा, म्हणाले – ‘नाही काढणार राजकीय पक्ष’

तामिळनाडू : वृत्तसंस्था – सुपरस्टार रजनिकांत यांच्या राजकारणातील प्रवेशाकडे देशातील कोट्यवधी चाहत्यांचे त्याचसोबत राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र, तामिळनाडू विधानसभा निवडणुका तोंडावर असताना रजनिकांत यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी एक पत्रक प्रसिद्ध करत आपण कोणताही राजकीय पक्ष स्थापन करणार नसल्याचे सांगितले आहे. प्रकृतीच्या कारणास्तव आपण माघार घेत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

ट्विट केलेल्या पत्रात रजनिकांत म्हणतात, “गेल्या काही दिवसांत माझ्या प्रकृतीबाबत ज्या काही घडामोडी घडल्या त्याला मी देवाचा इशारा समजतो. यामुळे मला सांगताना अतिशय वाईट वाटतंय की मी सध्या कोणताही राजकीय पक्ष सुरु करणार नाही. मात्र, तामिळनाडूच्या जनतेसाठी विविध माध्यमातून काम सुरु राहील.” त्याशिवाय, या निर्णयामागे मला ‘बळीचा बकरा’ बनवल्याचं मत यात करुन घेण्याचा गैरसमज कुणी करुन घेऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

अलीकडेच प्रकृती खालावल्याने रजनिकांत यांना हैदराबादमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना रक्तदाब आणि थकव्याचा त्रास जाणवत होता. २७ डिसेंबरला त्यांना रुग्णालयातुन सोडण्यात आले होते. पण, डॉक्टरांनी त्यांना एक आठवडा विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

दरम्यान, २०२१ मध्ये तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा रजनिकांत यांचा निर्णय ठरला होता. त्यासाठी रजनिकांत ३१ डिसेंबरला आपल्या राजकीय पक्षाची घोषणा करणार होते. रजनिकांत यांना तामिळनाडूचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणूनही पाहिले जात होते. परंतु, रजनिकांत यांनी माघार घेतल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.