‘राजकीय रामायण’ ! खरं तेच बोललो, माफी अजिबात मागणार नाही : सुपरस्टार रजनीकांत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘पेरियार हे हिंदू देवदेवतांवर कठोर टीका करायचे. १९७१ मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली सलेम येथे झालेल्या त्यांच्या सभेच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र व सीतेचे विवस्त्र फोटो लावण्यात आले होते. मात्र, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची टीका झाली नाही,’ असा दावा दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी केला. दरम्यान, द्रविडी चळवळीचे जनक पेरियार यांच्याबद्दल केलेल्या या वक्तव्यावरून तामिळनाडूत मोठा वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी रजनीकांत यांच्याविरुद्ध पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र, तरीही आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असून शब्द मागे घेणार नाही किंवा कोणतीही माफी मागणार नसल्याचे रजनीकांत यांनी सांगितले.

एका मुलाखतीत रजनीकांत यांनी पेरियार यांच्याविरुद्ध हे वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या विधानावरून नवा वाद निर्माण झाला असून द्रविडी पक्ष संघटनांनी यांच्या या वक्तव्याला तीव्र आक्षेप घेतला आहे. त्यामुळे रजनीकांत यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. संबंधित संघटनेकडून कलम १५३ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, रजनीकांत त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहेत. ‘पेरियार यांच्याविषयी मी जे काही बोललो ते पूर्णपणे सत्य आहे. यासंबंधित अनेक पुरावे आहेत. पेरियार यांच्या त्या सभेची माहिती देताना अनेक वर्तमानपत्रांनी हे सगळं छापलं होतं. त्यामुळं मी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही,’ असं रजनीकांत यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. त्यामुळं आता या वादाचा काय परिणाम होणार हे पाहणं महत्वाचं आहे.

फेसबुक पेज लाईक करा –