‘सुपरस्टार’ रजनीकांत यांना मराठी चित्रपटात साकारायची आहे ‘ट्रान्सजेंडर’ची भूमिका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांच्या दरबार या आगामी सिनेमाचा म्युझिक लाँच समारंभ नुकताच पार पडला. या कार्यक्रमात रजनीकांत चक्क मराठीत बोलताना दिसले. म्युझिक लाँचिंगनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एका प्रश्नाचं उत्तर मराठीत दिलं. याशिवाय त्यांनी मराठी सिनेमात काम करण्याची इच्छाही बोलून दाखवली. त्यांना मराठी सिनेमात ट्रान्सजेंडरची भूमिका साकारायची आहे.

दरबार सिनेमात रजनीकांत यांनी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकरली आहे. भूमिकेला घेऊन प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी मराठीत उत्तर दिलं. ते म्हणाले, “मी मराठी बोलतो. पण माझं मराठी बेळगावचं आहे. आम्ही घरातही मराठी बोलतो. मराठी सिनेमात काम करण्याची ऑफरसुद्धा मला आली होती. परंतु काही कारणास्तव ते होऊ शकले नाही. मला मराठी सिनेमात काम करण्याची इच्छा आहे.” यानंतर त्यांना विचारण्यात आलं की, कोणती भूमिका साकारायला तुम्हाला आवडेल? यावर ते म्हणाले, “मी बहुतेक सर्व प्रकारचे चित्रपट केले आहे. जवळपास 160 मराठी चित्रपटांमध्ये मी काम केलं आहे. इंडस्ट्रीत मला 45 वर्षे पूर्ण होत आहेत. मला ट्रान्सजेंडरची भूमिका साकारायला आवडेल.” असं ते म्हणाले.

दरबार सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर या सिनेमात नयनतारा, प्रतीक बब्बर, सुनील शेट्टी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा सिनेमा 9 जानेवारी 2020 रोजी रिलीज होणार आहे. हा सिनेमा हिंदीसह तमिळ, तेलगू आणि मल्याळम अशा चार भाषेत रिलीज होणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/