सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

पोलीसनामा ऑनलाईन टीम : दाक्षिणात्य सुपरस्टार ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सिनेसृष्टीत सर्वात मानाचा आणि सर्वोच्च पुरस्कार असलेल्या दादासाहेब फाळके पुरस्काराने रजनीकांत यांना सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. जावडेकर यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा केली.

कोरोनामुळे सर्वच पुरस्कारांची घोषणा लांबली असल्याने, यातच आता दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये सुपरस्टार रजनीकांत यांना ५१ वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहिर झाला आहे. तर ह्या पुरस्काराची घोषणा होताच रजनीकांत यांच्यावर अनेक चाहत्यांनी अभिनंदन केले आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय सिनेक्षेत्रातील कामगिरीसाठी केंद्र सरकारतर्फे दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. निर्णायक मंडळाद्वारे त्यांना हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला, असे जावडेकर म्हणाले.

दरम्यान, रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड आहे. १२ डिसेंबर १९५० रोजी बेंगळुरु येथील एका मराठी कुटुंबात जन्मलेल्या रजनीकांत यांचा प्रवास अप्रतिम आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांच्या इतकी लोकप्रियता कुणालाच मिळवता आली नाही. आजही रजनीकांत यांचा चित्रपट प्रदर्शित झाला की, त्यांचे चाहते चित्रपट आवर्जून बघत असतात.

दादासाहेब फाळके पुरस्कारने सुपरस्टार रजनीकांत यांना आनंद झाला आहे. यादरम्यान, मागील काही दिवसांपूर्वीच रजनीकांत यांनी सक्रिय राजकारणात येण्याची घोषणा केली होती. नव्या वर्षाच्या मुहूर्तावर ते आपल्या राजकीय पक्षाची घोषणाही करणार होते. मात्र अचानक रजनीकांत यांची प्रकृती बिघडली. त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल केले होते. ठीक होऊन घरी आल्यावर, त्यावेळी त्यांनी प्रकृतीचे कारण देत राजकारणाचा निर्णय मागे घेतला.