राजीव गांधी हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या ‘नलीनी’नं तुरुंगात आत्महत्येचा केला प्रयत्न, कैद्याशी झालं होतं भांडण

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषी नलीनीने काल रात्री तुरुंगात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नलिनी वेल्लोर तुरूंगात बंद असून तिने कथितपणे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नलिनी चे वकील पुगलेंती यांनी याबाबत माहिती दिली.

नलिनीचे वकील पुगलेंती यांनी एका वृत्तपत्राला या घटनेची माहिती दिली. वकिलाच्या म्हणण्यानुसार गेल्या 29 वर्षांपासून असे पहिल्यांदा घडले की नलीनीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असेल. वकिलाने सांगितले की जेलमध्ये नलिनी आणि एक कैदी यांच्यात कथितपणे भांडण झाले. नलीनीचे भांडण जिच्याशी झाले ती देखील जन्मठेपेच्या शिक्षेत तुरूंगात बंद आहे. या भांडणाबद्दल त्या कैदीने जेलरकडे तक्रार केली, त्यानंतर नलीनीने आत्महत्येचा प्रयत्न केला.

वकिलांनी सांगितले की नलीनीने यापूर्वी कधीही असा प्रयत्न केलेला नव्हता, त्यामुळे याचे खरे कारण जाणून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुगलेन्ती म्हणाले की, नलीनीचे पती मुरुगन यांनाही राजीव गांधी हत्या प्रकरणात तुरूंगात डांबले गेले आहे. त्यांनी विनंती केली आहे की नलीनीला वेल्लोर तुरूंगातून पुझल कारागृहात हलविण्यात यावे. मुरुगनची ही मागणी न्यायालयात मांडली जाईल असे वकील पुगलेन्ती यांनी सांगितले.