राजीव सातव यांचा ‘सायटोमॅगलो व्हायरस’मुळे मृत्यू, काय आहे ‘हा’ व्हायरस ? कसा होतो संसर्ग, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं. काही दिवसांच्या उपचारानंतर सातव यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला, त्यानंतर मात्र त्यांना न्युमोनियाचा पुन्हा संसर्ग झाला होता. महराष्ट्राच्या राजकारणातील एक उमदा नेता अशी राजीव सातव यांची ओळख होती. आज (रविवार) सकाळी अचानक त्यांच्या मृत्यूची बातमी आली अन् राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. सातव यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या शरिरात सायटोमॅगलो व्हायरस देखील आढळला.

काय आहे सायटोमॅगलो व्हायरस ?

सायटोमॅगलो हा संसर्गजन्य आजार आहे. एका मराठी वृत्तवाहीनीने दिलेल्या वृत्तानुसार, गरोदर महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक असते. यामध्ये गर्भपात होण्याची दाट शक्यता असते. तसेच एचआयव्ही ग्रस्तांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त आढळतं.या व्हायरसमुळे दृष्टी जाऊ शकते. तसेच रेटिनावर देखील परिणाम होते. काही जणांच्या फुफ्फुसात देखील याचे इन्फेक्शन होते. त्याला सीएमई न्यूमोनिया असेही म्हटले जाते. या आजारामुळे रुग्णांना डायरियाचा त्रास होणे तसेच मेंदूमध्ये संसर्ग होण्याचा धोका असतो.

कसा होते संसर्ग ?

या व्हायरसनं संक्रमित असलेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्याने याची लागण होते. संक्रमित रुग्णाची लाळ, रक्त आणि लघवीतून हा व्हायरस पसरतो. स्तनपान करणाऱ्या आईपासून बाळाला देखील याचा संसर्ग होऊ शकतो. नवजात बाळ तसेच लहान मुलांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात आढळून येतो. मात्र ज्याची प्रतिकारकशक्ती कमी आहे, अशा प्रौढ व्यक्तींना याची लगेच लागण होऊ शकते, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

प्रौंढांना याची लागण झाली तर त्याची लक्षणे दिसून येत नाही. परंतु कोरोना सारख्या आजारामुळे व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने याचा मेंदू, डोळे आणि फुफ्फुसांवर परिणाम होण्याची शक्यता असते.

सातव यांना देखील लागण झाली होती

राजीव सातव यांना एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांना पुण्यातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 10 मे रोजी त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांना लवकरच रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार होते. मात्र, त्यातच त्यांना सायटोमॅगलो व्हायरची लागण झाली आणि त्यांची आज प्राणज्योत मालवली.