सुशिलकुमार शिंदे यांच्यासह ‘या’ 3 दिग्गजांना डावलून काँग्रेसनं राजीव सातवांना दिली राज्यसभेची उमेदवारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेसकडून राजीव सातव यांचं नाव निश्चित करण्यात आले आहे. पक्षातील दिग्गज नेत्यांना बाजूला सारून राजीव सातव हे राज्यसभेत जाणार आहेत. महाराष्ट्रात राज्यसभेच्या सात जागा असून त्यापैकी एक जागा काँग्रेसच्या वाट्याला आली आहे. या एका जागेसाठी मुकूल वासनिक, रजनी पाटील, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अनेक दिग्गजांची नावे चर्चेत होती. मात्र, राहुल गांधींच्या विश्वासातले 45 वर्षीय राजीव सातव यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

राजीव सातव यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. सध्या ते गुजरातचे प्रभारी म्हणून काम पहात आहेत. 2009 मध्ये ते कळमनुरी मतदारसंघातून आमदार तर 2014 मध्ये हिंगोली मतदारसंघातून लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले होते. काँग्रेसमध्ये राहुल आणि प्रियंका गांधी या दोघांच्या विश्वासू गोटात असलेले जे मोजके नेते आहेत त्यापैकी राजीव सातव हे एक आहेत.

राजीव सातव यांना 45 व्या वर्षी राज्यसभेवर जाण्याची संधी मिळाली आहे. एवढ्या कमी वयात तेही काँग्रेससारख्या पक्षाकडून राज्यसभेवर जाण्याची संधी क्वचितच लोकांना मिळाली आहे. एकीकडे ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता राहुल ब्रिगेडमधल्या नेत्यांना वयाचा विचार न करता संधी मिळाल्याचं या निमित्ताने दिसत आहे. राजीव सातव यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात पंचायत समितीतून केली होती. त्यानंतर ते जिल्हा परिषदेवर निवडून गेले. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे.