राजीव सातव यांचे होते पुण्याशी जिव्हाळ्याचे संबंध

पुणे : काँग्रेसचे नेते, राहुल गांधी यांचे निकटवर्ती आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे पुण्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते. या पुण्यातच त्यांनी तब्बल २३ दिवस झुंज दिली. शेवटी ही झुंज अपयश ठरली.

राजीव सातव यांच्या आई रजनी सातव त्यांचे माहेर पुण्यातील बुधवार पेठेत होते. त्यांचे माहेरचे आडनाव वाघ होते. राजीव सातव यांचे शालेय शिक्षण पुण्यातील नूमवी शाळेत झाले. त्यानंतर त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी घेतली.

फर्ग्युसन महाविद्यालयात असताना त्यांनी विद्यापीठ निवडणुकीत भाग घेतला होता. पुण्यात त्यांचे कॉलेज जीवनापासूनचे काही मोजक्या मित्रांशी त्यांचा अजूनही संपर्क होता. पुण्यात आल्यावर ते या मित्रांशी संपर्क साधत असत.

काँग्रेस पक्षात त्यांच्यावर मोठ मोठी जबाबदारी पडल्यानंतर त्यांचे पुण्यातील येणे जाणे थोडे कमी झाले़ केंद्रात जबाबदारी असली तरी त्यांनी पुण्यातील काँग्रेस पक्षातही त्यांनी जवळचे मित्र जोडले होते.