‘राजकुमार’ वाघाची 3 वर्षांनी पिंजऱ्यातून सुटका, गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयात स्थलांतर

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – अतिशय अशा ‘राजकुमार’ वाघाची तब्बल तीन वर्षांनी पिंजऱ्यातून सूटका( rajkumar-tiger-released-from-cage-after-three-years) करून गोरेवाडा प्राणी संग्रालयात त्याचे स्थलांतर करण्यात आले आहे. त्यामुळे तीन वर्षानंतर या वाघाला मोकळा श्वास घेता येणार आहे. गोरेवाडा प्रशासनाने वन्यप्राणी बचाव केंद्रातून प्राणीसंग्रहालयात स्थलांतरीत करुन ‘भारतीय सफारी’च्या दिशेने पहिले यशस्वी पाऊल उचलले आहे. तीन वर्षापूर्वी थेट लग्नमंडपात प्रवेश करुन धुमाकूळ घातल्याने या वाघाला जेरबंद व्हावे लागले होते.

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालयात भारतीय सफारी, अफ्रिकन सफारी आणि नाईट सफारी सुरू करण्यात येत आहे. त्यातील पहिला टप्पा भारतीय सफारीने पूर्ण झाला आहे. ही सफारी सुरू करण्यापूर्वीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाकडे अहवाल पाठवण्यात आला. त्यानंतर प्राधीकरणाच्या परवानगीनंतर बचाव केंद्रातील वन्यप्राणी प्राणीसंग्रहालयातील खुल्या पिंजऱ्यांत सोडण्याची प्रक्रिया शुक्रवारी सुरू केली आहे.  ‘राजकुमार’ नामक पाच वर्षीय वाघाला केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत यशस्वरित्या स्थलांतरीत केले आहे.

डिसेंबर 2107 मध्ये या वाघाने भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात एका लग्नमंडपात प्रवेश करुन दहशत माजवली होती. त्याने कुणालाही जखमी केले नसले तरी या घटनेने परिसरात दहशत होती. त्यानंतर या वाघाला जेरबंद करुन गोरेवाड्यातील वन्यप्राणी बचाव केंद्रात आणले. गेल्या तीन वर्षात त्याच्या वर्तणूकीतून कुठेही हिंस्त्रपणा दिसून आला नाही.भारतीय सफारीकरिता पहिल्या टप्प्यात दोन वाघ (नर आणि मादी), सात बिबटे (दोन नर आणि पाच मादी) आणि सहा अस्वल (तीन नर आणि तीन मादी) सोडण्यात येणार आहे. उद्यापासून इतरही वन्यप्राण्यांना प्राणीसंग्रहालयात स्थलांतरीत करण्यात येणार आहे. त्यानंतर तीन आठवडे या वाघांच्या वर्तणुकीवर लक्ष देऊन डिसेंबर अखेरीस सफारी पर्यटकांसाठी सुरू होण्याचे संकेत आहेत.