यामुळे पोलीस आयु्क्तांच्या घरावर छापे : राजनाथ सिंह

पश्चिम बंगाल : वृत्तसंस्था – एकीकडे पोलीस आयुक्तांच्या घरी सीबीआय छापेमारीचा मुख्यमंत्री ममत बॅनर्जींनी निषेध केला आहे. या निषेधार्थ ममत बॅनर्जींनी यांनी धरणे आंदोलन छेडले आहे. असे असतानाच गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सीबीआयच्या छापेमारीमागची कारणमीमांसा केल्याचे दिसत आहे. दरम्यान कोलकात्यामध्ये सुरू असलेल्या सीबीआय विरुद्ध बंगाल पोलीस या राजकीय नाट्याचे पडसाद आता संसदेतही उमटायला लागल्याचे दिसत आहे.

आधी बंगाल पोलिसांच्या आखत्यारीत असणाऱ्या शारदा चिट फंड प्रकरणाचा तपास करण्याची परवानगी सीबीआयने सर्वोच्च न्यायालयाकडून घेतली आहे. न्यायालयाकडून परवानगी घेतल्यामुळेच सीबीआयने कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. एवढेच नाही तर, या प्रकरणी चौकशीसाठी दोन-तीनदा बोलावलेही होते. परंतु राजीव कुमार यांनी सीबीआयच्या सर्वच नोटीसांकडे दुर्लक्ष करत कानाडोळा केला. त्यांच्या या दुर्लक्ष करण्यामुळेच अखेर सीबीआयच्या अधिकाऱ्यांना राजीव कुमार यांच्या घरी छापे टाकावे लागले अशी माहिती गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे.

दरम्यान राजीव कुमार यांची चौकशी करण्यासाठी गेलेल्या सीबीआय पोलिसांनाच बंगाल पोलिसांनी अटक केली. यानंतर सीबीआय पोलीस आणि बंगाल पोलीस यांच्यात कारवाई सत्र सुरू झाले. यानंतर सीबीआय पोलीस आणि बंगाल पोलिसांनी एकामेकावर एका रात्रीत अनेक कारवाया केल्याचं चित्र पाहायला मिळालं. याच पार्श्वभूमीवर या छापासत्राचा विरोध करण्यासाठी ममता बॅनर्जींनी धरणे आंदोलन सुरू केलं. दरम्यान सरकार सीबीआयचा गैरवापर करत आहे असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.