नाहीतर वेगळ्या भाषेत सांगू, कर्जमाफीवरून राजू शेट्टींचा सरकाराला इशारा

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राज्यातील शेतकऱ्यांना खुषखबर दिली. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाखापर्य़ंतचे कर्ज माफ केल्याची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली असली तरी राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका करत ही कर्जमाफी नेमकी कोणासाठी आहे असा सवाल केला आहे. तसेच कर्जमाफीच्या धोरणात बदल करा, नाहीतर वेगळ्या भाषेत सांगू असा सज्जड दम त्यांनी सरकारला दिला आहे.

कर्जमाफी घोषित झाल्यानंतर देखील शेट्टी यांनी सरकारवर टीका केली होती. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं. हे आश्वासन दोन लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीने पूर्ण होणार नाही. यामध्ये 30 सप्टेंबर 2019 पर्यंत कर्जमाफी करण्याचा निर्णय हा वास्तविक पाहता बरोबर नाही. कारण राज्यात दुष्काळ त्यानंतर नापिकी, महापूर, ओला दुष्काळाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अवकाळी पाऊस आणि महापुरामुळे ज्या पिकाचं नुकसान झाले आहे. त्या पिकांवर काढलेल्या पीक कर्जाची मुदत 30 जून 2020 आहे. त्यामुळं थकबाकी जाण्याचा विषयच नव्हता, असे शेट्टी यांनी म्हटलं आहे.

ज्या पिकांचे नुकसान झाले आहे त्या पिकांना ना कर्जमाफी मिळाली ना फायदा मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, ते देशोधडीला लागले ते वंचित राहिले. सरकारने केलेली कर्जमाफी नेमकी कोणाला मिळणार आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत सरकारला धारेवर धरले. या कर्जमाफीबाबत आकडेवारी तपासावी लागेल. नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी जर असेल तर ते शेतकरी या योजनेत बसणार नाहीत, असे त्यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/