शरद पवार यांनी कधीही भ्रष्टाचार केला नाही : राजू शेट्टी

कोल्हापूर :  पोलीसनामा ऑनलाईन – शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाने गुन्हा दाखल केला आहे. मात्र या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शरद पवारांची पाठराखण केली आहे. या प्रकरणाचा भाजपा आणि सरकार आपल्या सोयीने वापर करून घेत आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे  शिखर बँकेचा घोटाळा, साखर कारखाना विक्री व्यवहार घोटाळा, बेकायदेशीर कर्ज प्रकरण घोटाळ्याचे  राजू शेट्टी पहिले तक्रारदार आहेत.  पुण्याच्या शिवाजीनगर पोलिस स्टेशनला राजू शेट्टी यांनी पहिली तक्रार दाखल केली होती.

ज्यांच्या आशिर्वादाने कर्ज दिले ते बहुसंख्य लोक भाजपमध्ये-

शरद पवार यांची पाठराखण करताना राजू शेट्टी म्हणाले की , ‘  शरद पवार यांनी कधीही भ्रष्टाचार केला नाही. मी पवारांवर कधीही वैयक्तिक आरोप केले नाहीत . मी चुकीचं समर्थन करणार नाही. चौकशी झाली पाहिजे. चोरांना पकडलेच पाहिजेत. यासाठी  मी ईडीला भेटलो. याचिका दाखल केली. अण्णा हजारेंनी देखील तक्रार दाखल केली. यामध्ये सर्व पक्षाचे नेते आहेत. संचालक मंडळाने लायक नसलेल्या लोकांना कर्ज दिले. ज्यांच्या आशिर्वादाने कर्ज दिले ते बहुसंख्य लोक भाजपमध्ये आहेत. या प्रकरणाचा भाजपा आणि सरकार आपल्या सोयीने वापर करून घेत आहे.’

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने  शरद पवार आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसहीत 70 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. बँकेच्या संचालकांसह राज्यातील बड्या नेत्यांसाठी हा झटका मानला जात आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीतही यामुळे वाढ होणार आहे. मात्र असे असतानाच या संपूर्ण प्रकरणाशी शरद पवार यांचा थेट काय संबंध आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे.

 

Visit : policenama.com