ED, CBI ची पीडा लावणार्‍यांना सन्मानानं ‘आमंत्रण’, नुकसान सोसणारे घटकपक्ष मात्र ‘बेदखल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून विधानभवनाच्या परिसरात एकूण ३६ नेत्यांनी शपथ ग्रहण केली. दरम्यान सगळ्यांना उत्सुकता होती की कुणाला मंत्रिपदासाठी कुणाची वर्णी लागते तर कुणाला वंचित रहावे लागते. या मंत्रिमंडळाच्या विस्तारात अनेक चेहऱ्यांना संधी मिळाली तर काही दिग्गज नेत्यांना मंत्रिपद मिळालेले नाही. विशेष म्हणजे या मंत्रिमंडळ विस्तारात स्वाभिमानी शेतकरी संघटना नाराज असल्याचे वृत्त समोर येत आहे.

आजच्या शपथविधी कार्यक्रमाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी उपस्थित नव्हते. राजू शेट्टींनी नाराजी दाखवत ट्विट केले आहे की, “ज्यांनी, ईडी, इनकम टॅक्स, सीबीआयची पीडा मागे लावली त्यांना शपथविधीसाठी सन्मानाने आमंत्रण आणि ज्यांनी भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी स्वतःच नुकसान सोसून आटोकाट प्रयत्न केले ते सर्व घटकपक्ष मात्र शपथविधीला बेदखल.” अशा पद्धतीने राजू शेट्टींनी आपली नाराजी व्यक्त केली.

विशेष म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी वेळोवेळी सांगितले होते की, आम्ही मंत्रिमंडळाचा विस्तार करू तेव्हा सर्व घटक पक्षांना त्यात सामावून घेऊ, सर्व घटक पक्षांना मंत्रिपदाची संधी देऊ परंतु तसे काहीही घडले नाही. मंत्रिमंडळाच्या यादीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एकही नेत्याचे नाव नव्हते. त्यामुळे राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांनी मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे पाठ फिरविली आणि पुण्यातच थांबले. शपथविधीला उपस्थित न राहण्याचे संकेतही त्यांनी दिले होते. शिवाय मंत्रिमंडळ विस्ताराच्या बैठकीला देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आमंत्रण नसल्याने राजू शेट्टी हे नाराज असल्याचे वृत्त समोर आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/