राजू शेट्टींनी केलं होतं ‘गोविंदबागे’समोर आंदोलन, आज ‘त्याच’ घरातून स्विकारली आमदारकी

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून माजी खासदार राजू शेट्टी हे राज्यपालनियुक्त आमदार होणार हे आज निश्चित झाले आहे. आज बारामतीमध्ये ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राजू शेट्टी यांच्या चर्चा झाली. या चर्चेत राजु शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाच्या आमदारकीचा प्रस्ताव मान्य केला आहे. शेतकरी संघटनेचे बारामतीचे ज्येष्ठ नेते सतीश काकडे यांनीही याला दुजोरा दिला आहे. या घडामोडीमध्ये सतीश काकडे यांची भूमिका महत्त्वाची आहे.
शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंदबाग निवासस्थानी राजू शेट्टी, सतीश काकडे, रेजेंद्र ढवाण आदींची बैठक झाली.

या बैठकीदरम्यान राजू शेट्ट यांनी आमदारकीचा प्रस्ताव मान्य केल्याचे काकडे यांनी सांगितले. खासदार सुप्रिया सुळे या देखील बैठकीला उपस्थित होत्या. राजू शेट्टी यांनी सहा वर्षापूर्वी शेतकऱ्यांना ऊस दरवाढ मिळावी यासाठी गोविंदबागेत जाऊन आंदोलन केले होते. आता त्याच घरात जाऊन राजू शेट्टी यांनी आमदारकी स्विकारली आहे. जवळपास अडीच तासापेक्षा अधिक काळ पवार यांनी स्वत:च्या गाडीतून राजू शेट्टी यांना फिरवत या परिसरात सुरु असलेल्या नवीन शेतीच्या प्रयोगांबाबत स्वत:हून माहिती दिली.

यावेळी शरद पवार यांनी विविध शेतीचे प्रयोग, कृषी विज्ञान केंद्र, सेंटर ऑफ एक्स्लेन्स याची माहिती राजू शेट्टी यांना दिली. मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकत्रित येऊन राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातील आमदारकी देण्याचे निश्चित केले. राजू शट्टी यांनी राष्ट्रवादीचा प्रस्ताव मान्य केल्यामुळे आता पवार व शेट्टी याचे मैत्रीपर्व सुरु होईल, अशी चर्चा आहे.