प्रत्यक्ष मतदानापेक्षा ‘एवढी’ जास्त मते मोजली गेली ; राजू शेट्टींच्या आरोपाने खळबळ

हातकणंगले : पोलीसनामा ऑनलाईन – हातकणंगले मतदारसंघात मतमोजणीदरम्यान ४५९ मते जास्त निघाल्याचा आरोप माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. त्याबाबत राजू शेट्टी यांनी निवडणूक आयोगाकडे गुरुवारी तक्रार दाखल केली आहे.

ईव्हीएमद्वारे झालेलं मतदान आणि निकालावेळी मोजली गेलेल्या मतांची संख्या यात तफावत असल्याचा शेट्टी यांचा आरोप आहे. हातकणंगले मतदारसंघात ईव्हीएमद्वारे १२ लाख ४५ हजार ७९७ एवढं मतदान झालं. पण नंतर ईव्हीएममधून १२ लाख ४६ हजार २५६ एवढी मते मोजली गेली. म्हणजे एकूण४५९ मते जास्त मोजली गेली आहेत. यामध्ये पोस्टलची मते धरलेली नाहीत, असं राजू शेट्टी यांचं म्हणणं आहे. हा फरक कशामुळे झाला आहे याचे स्पष्टीकरण करण्याची मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

राजू शेट्टी यांचा पराभव –

हातकणंगले लोकसभा मतदार संघात यंदाची लढत ही चुरशीची ठरली. या मतदार संघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विद्यमान खासदार राजू शेट्टी तर शिवसेनेकडून धैर्यशील माने यांच्यात प्रमुख लढत रंगली. २०१४ च्या निवडणुकीत भाजप सोबत लढून राजु शेट्टी यांनी खासदारकी मिळवली होती. मात्र यंदा त्यांचा पराभव झाला. या निवडणुकीत शिवसेनेचे धैर्यशील माने यांना ५,८५,७७६ मते मिळाली. तर राजु शेट्टी यांना ४,८७,२७६ मते मिळली. धैर्यशील माने हे ९६,०३९ मतांनी विजयी झाले.

Loading...
You might also like