आघाडीत स्वाभिमानीला दोन जागा ; राजू शेट्टी आघाडी सोबतच

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीसाठी आघाडीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दोन जागा देण्याचे म्हंटले आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सोबतच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. सर्व पक्ष , मित्र पक्षांना येत्या लोकसभा निवडणुकीत सत्ता स्थापन करण्यासाठी सोबत घेत आहेत. याचदरम्यान आघाडीत जाण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आघाडीकडे तीन जागांची मागणी केली होती. दरम्यान राजू शेट्टी यांनी आघाडीकडे बुलडाणा, वर्धा किंवा सांगली या पैकीच कोणतीही एक जागा आपल्याला मिळावी असा आग्रह धरला आहे. त्यास दोन्ही काँग्रेसने सहमती दिली आहे. त्यावेळी विदर्भातील जागा मिळण्यात अडचणीच जास्त दिसत असल्याने स्वाभिमानीच्या वाट्याला सांगलीची जागा येण्याची शक्यता आहे. असे राजू शेट्टी यांनी म्हंटले आहे.

विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते अहमद पटेल, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याशी खासदार राजू शेट्टी यांनी यासंदर्भात फोनवर चर्चा झाली. शेट्टी यांच्यासाठी हातकणंगलेची जागा यापूर्वीच सोडण्यात आली आहे. ही जागा आपल्या कोट्यातून सोडली असल्याचे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे. त्यामुळे आता काँग्रेसने स्वाभिमानीला एक जागा सोडावी यावर एकमत झाले असल्याचे समोर आले आहे.

इतकेच नव्हे तर, स्वाभिमानीला बुलडाण्याची जागा सोडायची असेल तर काँग्रेसने ती आपल्याकडे घेवून स्वाभिमानीला सोडावी लागणार आहे. परंतू राष्ट्रवादी आजही बुलडाण्याची जागा सोडायला तयार नाही. ती सोडायची असेल तर मग काँग्रेसने आपल्याला औरंगाबादची जागा सोडावी असा राष्ट्रवादीचा आग्रह आहे परंतू त्यास काँग्रेस तयार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

खासदार राजू शेट्टींनी केलेल्या मागणीवर आज दिल्लीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बैठक होणार असल्याची शक्यता वर्तवल्या जात आहे.