लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता द्या : राजू शेट्टी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लिंगायत समाजाला त्वरीत स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी लोकसभेत केली. स्वतंत्र धर्माच्या मागणीसाठी लिंगायत समाज बांधव अतिशय शांततेच्या मार्गाने मार्चे काढत असून त्यांची मागणी रास्त आहे. त्यामुळे सदनाने या समाजाला त्वरीत स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता देऊन योग्य तो सन्मान करावा, अशी मागणी खासदार शेट्टी यांनी केली.

खासदार राजू शेट्टी लोकसभेत नियम ३७७ अन्वये सूचना मांडताना म्हणाले, लिंगायत धर्म संस्थापक धर्मगुरू महात्मा बसवेश्वर हे एक महान, द्रष्टे समाजसुधारक, संत होते. त्यांना विश्वगुरू म्हटले जाते. १२व्या शतकात जेव्हा अंधश्रद्धा, स्पृश्य-अस्पृश्य, व जातीयवादी उन्माद एका उंचीवर होता, त्यावेळी गुरू बसवेश्वररुपी सूर्याचा भारतीय क्षितिजावर उदय झाला. महात्मा बसवेश्वर हे आजही भारतीय संस्कृतीचा असे व्यक्तिमत्व आहे की, ज्याची चमक नित्य नवी असून कायमस्वरुपी म्हणजेच शाश्वत आहे. आज जवळपास ८०० वर्षांपूर्वी कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेलगत राहणाऱ्या जनतेच्या मनामध्ये गुरू बसवेश्वरांबाबत अनन्यसाधारण स्थान आहे.

लिंगायत धर्माला मानणाऱ्या मतांनुसार लिंगायत हा धर्म स्वतंत्र आहे. ही केवळ एक जात नाही. आणि हा लिंगायत समाज सरकारकडून स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळावी यासाठी रस्त्यावरचा संघर्ष करीत आहे. जैन आणि बुद्ध धर्माप्रमाणे लिंगायत धर्मालाही स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्यात यावा. त्यांची ही मागणी न्यायोचित असून संविधानाला धरूनच आहे. हा समाज गेल्या अनेक वर्षापासून स्वंतत्र धर्माची मान्यता द्या. म्हणून संघर्ष करून देशभरातील लिंगायत बांधव रस्त्यावर उतरलेला आहे.

अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोर्चे काढले आहेत. हे मोर्चे अतिशय शांततेच्या मार्गाने असून त्यांची मागणी रास्त आहे. त्यामुळे सदनाने या समाजाला त्वरीत स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता देऊन योग्य तो सन्मान करावा, असे शेट्टी म्हणाले.