ब्राह्मण समाजाबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्याबद्दल राजू शेट्टींची दिलगिरी

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – सैन्यात आपली पोरं जातात. देशपांडे, कुलकर्णींची पोरं सैन्यात जात नाही असं वादग्रस्त विधान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी काल केलं होतं. त्यानंतर आता राजू शेट्टी यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानतंर पुण्यातील ब्राह्मण जागृती सेवा संघानं खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. इतकेच नाही तर त्यांनी आंदोलनाची हाकही दिली होती. यानंतर आता राजू शेट्टी यांनी त्याबाबत दिलगिरी व्यक्त करत त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

केलेल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त करताना राजू शेट्टी म्हणाले की, “बोलताना माझ्याकडून अनावधानानं उल्लेख झाला. माझा मुळ उद्देश हा शहिद जवान आणि वारसांना न्याय देण्याचा होता. कुणीही माझ्या वक्तव्याने वाईट वाटून घेऊ नका.” असं राजू शेट्टी म्हणाले आहेत.

पुढे बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, “माझ्या मनाला जातीयवाद शिवू शकत नाही. मी फुले शाहू आंबेडकरांच्या जडणघडणीतला असून शरद जोशी यांच्या संघटनेचा मला वारसा आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या वादावर आता राजू शेट्टी यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

अनेकदा प्रचारसभेत बोलताना राजकीय नेत्यांकडून आक्षेपार्ह किंवा वादग्रस्त विधानं केली जातात. सभेत बोलताना नेत्यांना बऱ्याचदा भान राहत नाही. नंतर मग नेते मंडळी केलेल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त करतात.