अण्णा हजारे यांची कोरोना चाचणी ‘निगेटिव्ह’, खबरदारी म्हणून केली ‘टेस्ट’

राळेगण सिद्धी : पोलिसनामा ऑनलाईन – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची कोरोना चाचणी ‘निगेटिव्ह’ आली आहे, अशी माहिती तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिलीय. हजारे यांच्या कोरोनाच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत, त्यामुळे राळेगण सिद्धी ग्रामस्थांची काळजी मिटलीय.

मंगळवारी ( दि.11) ते कालपर्यंत गावात सहा कोरोना रूग्ण आढळून आले होते. त्यामुळे वर्तमळा भाग आणि हजारे सध्या राहत असलेला परिसर हिंद स्वराज ट्रस्ट परिसर 14 दिवसांसाठी प्रतिबंधक क्षेत्र म्हणून तहसीलदार ज्योती देवरे यांनी जाहीर केलाय.

राळेगण सिद्धीतील वर्तमळा भागातील एक महिलेला मंगळवारी कोरोनाची लागण झाल्याचे पुणे महानगरपालिकेच्या अहवालावरून स्पष्ट झाले. याच महिलेचा पती हजारे यांच्या हिंद स्वराज ट्रस्ट परिसरात कर्मचारी म्हणून कामाला होता. त्याच्याशी थेट संपर्क आला नसला तरी देखील खबरदारी म्हणून प्रशासन आणि आरोग्य विभागाने हजारे यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेऊन बुधवारी दोन चाचण्या केल्या. त्यात रॅपिड अँटीजेन चाचणीचा निगेटिव्ह अहवाल त्याच दिवशी आला असून स्वॅब चाचणीचा अहवाल गुरूवारी रात्री उशिरा आला. हजारे यांच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडलाय.

वर्तमळा परिसरातील महिलेच्या संपर्कात आलेल्यांची कोरोना चाचणी केल्यानंतर तिची दोन मुले तसेच अन्य कुटुंबातील तीनजण कोरोनाग्रस्त असल्याचे आढळले आहेत.

वर्तमळा आणि हिंद स्वराज ट्रस्ट परिसर प्रतिबंधक क्षेत्र जाहीर झाल्यानंतर राळेगण सिद्धी गावही लॉकडाऊनचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिलेत. गावांतर्गत रस्ते ये-जा करण्यासाठी बंद केलंय. सध्या मूग काढणी सुरू असून दैनंदिन दुध घालण्यासाठी तसेच शेतातून चारा आणणार्‍या शेतकर्‍यांना ये-जा करावी लागतेय. त्यामुळे शेतकर्‍यांतून नाराजीचा सूर उमटतोय.