राज्यसभा निवडणूक : भाजपचा तिसरा उमेदवार कोण ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व फौजिया खान हे दोघे राज्यसभेच्या सात जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी आज अर्ज भरणार आहेत. भाजप कडून उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांची नावे जरी असली तरी तिसरा उमेदवार कोण असेल हे अद्याप समोर आले नाही.

२६ मार्च रोजी महाराष्ट्राच्या कोट्यातून ७ जगासाठी निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादीकडून शरद पवार व फौजिया खान आज विधान भवनात अर्ज दाखल करणार आहेत. अद्याप भाजप, शिवसेना आणि काँग्रेस यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली नाही. भाजपकडून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले व साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजतं आहे. पण तिसरा उमेदवार कोण आहे हे काही समोर आले नाही. तिसऱ्या जागेसाठी एकनाथ खडसे यांच्या नावचा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला आहे. पण एकनाथ खडसे दिल्लीत जाण्यास होकार देतात का नाही हे अद्याप समजू शकले नाही. त्याचबरोबर राज्यसभेच्या शर्यतीत शायना एन.सी. यांचही नाव समोर येत आहे. यामुळे या दोन्ही नावांपैकी कोणत्या एका नावाला पसंती मिळेल, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

काही दिवसांपूर्वी पुण्यातील भाजपचे नेते संजय काकडे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यसभेवर दावा केला होता. पक्षानं मेरिटवर निर्णय घेऊन आपल्याला संधी द्यावी, असं म्हणत उदयनराजे यांच्या नावाला त्यांनी विरोध दर्शवला होता. त्यानंतर आता भाजप काय भूमिका घेतेय हेही पाहावं लागणार आहे.