8 राज्यांमध्ये 19 राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक, गुजरातमध्ये 3 MLA करणार प्रॉक्सी वोट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना काळात राज्यसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर राजकारण तापले होते. आमदारांची पळवा-पळवी, पक्षांमधील शह – काटशह सुरू होते. आता निवडणुकीची वेळ आहे. आज 8 राज्यांमध्ये राज्यसभेच्या 19 जागांसाठी निवडणुका होत आहेत. काँग्रेस आणि भाजपाच्या अनेक बड्या नेत्यांचे भवितव्य या निवडणुकीतून ठरणार आहे.

मध्य प्रदेशात राज्यसभेच्या 3 जागांसाठी 4 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपा आणि काँग्रेस दोघांनीही दोन-दोन उमेदवार उतरवले आहेत, तर गुजरातच्या जागांसाठी पाच उमेदवार उभे आहेत. भाजपाचे तीन उमेदवार आहेत तर काँग्रेसचे दोन नेते लढत आहेत.

गुजरातमध्ये भाजपाचे तीन आमदार केशरी सिंह सोलंकी, पुरुषोत्तम सोलंकी आणि शामूभूजी ठक्के प्रॉक्सी वोटचा वापर करतील.

राजस्थानमध्ये सुद्धा राज्यसभेच्या तीन जागा आहेत आणि 4 उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेस आणि भाजपा दोघांनीही दोन-दोन उमेदवार उतरवले आहेत.

झारखंडमध्ये राज्यसभेच्या 2 जागांवर 3 उमेवार रिंगणात आहेत. जेएमएम, बीजेपी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एक-एक उमेदवार मैदानात उतरवला आहे. आंध्र प्रदेशात चार जागा आहेत आणि पाच उमेदवार रिंगणात आहेत.

पूर्वोत्तरच्या मणिपुर, मेघालय आणि मिझोरमच्या एक-एक राज्यसभेच्या जागेसाठी सुद्धा आज निवडणुक होणार आहे. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्यसभेसाठी दोन्ही जागा जिंकण्याचे पक्षाचे गणित गडबडले आहे. बुधवारी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या डिनर पार्टीत बसपा, सपा आणि अपक्षांच्या उपस्थितीने भाजपाचा मार्ग सोपा केला आहे.