राकेश झुनझुनवाला यांच्या अडचणीत वाढ, ‘सेबी’नं बजावली नोटीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारतातील गुंतवणूक गुरु समजल्या जाणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांच्यावर इन्सायडर ट्रेडिंगचा आरोप केला आहे. याप्रकरणी सेक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने गंभीर दखल घेत त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना नोटीस बजावली आहे. त्यांनी केलेल्या गुंतवणूकीवर सेबीने काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

झुनझुनवाला यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास सेबी कडून त्यांची डीमॅट बँक खाती गोठवली जाऊ शकतात. अ‍ॅप्टेक कंपनीच्या शेअर खरेदी प्रकरणात झुनझुनवाला यांनी इन्सायडर ट्रेडिंगच्या माध्यमातून नफा मिळविल्याचा संशय सेबीने व्यक्त केला आहे. या प्रकरणाची चौकशी जानेवारी पासून सुरु आहे. झुनझुनवाला यांच्याकडे या कंपनीच्या व्यवस्थापनाचे अधिकार असल्याचे निदर्शनास आले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, सेबीने या प्रकरणी झुनझुनवाला यांची पत्नी रेखा, त्यांचा भाऊ राजेशकुमार आणि बहीण तसेच सासू यांची चौकशी केली आहे. मे 2016 ते ऑक्टोबर 2016 या दरम्यान अ‍ॅप्टेक कंपनीच्या शेअर खरेदी-विक्री व्यवहाराचा सेबीने चौकशी केली आहे.

काय आहे प्रकरण ?
झुनझुनवाला यांनी 2005 मध्ये अ‍ॅप्टेक कंपनीच्या शेअरची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. यामध्ये इन्सायडर ट्रेडिंग झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 2005 मध्ये त्यांनी या कंपनीचा शेअर 56 रुपयांना खरेदी केला होता. टप्प्याटप्याने कुटुंबातील इतर सदस्यांनीही शेअर खरेदी केले. झुनझुनवाला आणि त्यांच्या कुटुंबीयांना अ‍ॅप्टेकच्या भविष्यातील योजना, आर्थिक स्थिती सारख्या गोपनीय गोष्टींची आधीच माहिती होती. यावरून त्यांनी ट्रेडिंग करून जास्त नफा कमावला असा ठपका सेबीने ठेवला आहे. यातून कंपनीचे मूल्य 690 कोटी रुपये झाले. तसेच कुटुंबीयांकडे 49 टक्के हिस्सेदारी गेली. परिणामी झुनझुनवाला यांनी नियंत्रकाच्या पूर्वपरवानगीशिवाय संचालकपद का बहाल केले, असा प्रश्न सेबीने अ‍ॅप्टेकच्या व्यवस्थापनाला केला आहे.