राकेश मारियांच्या पुस्तकातून आणखी एक मोठा खुलासा, काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारवर केले ‘गंभीर’ आरोप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुंबईचे माजी पोलीस कमिश्नर राकेश मारिया यांनी आपल्या पुस्तकात आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. ‘लेट मी से ईट नाऊ’ या आपल्या पुस्तकात राकेश मारिया यांनी तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

राकेश मारिया यांनी विलासराव देशमुख सरकारमधील तत्कालिन उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर पोलीस तपासात हस्तक्षेप केल्याचा गंभीर आरोप केला आहे. मारिया यांच्या पुस्तकानुसार, डिसेंबर 1999 मध्ये एका केसमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या मनासारखी पोलीस कारवाई न झाल्याने तत्कालीन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने मारिया यांची बदली केली होती.

1999 मध्ये राकेश मारिया नॉर्थ वेस्ट रिजनचे अ‍ॅडिशनल कमिश्नर होते. बांद्रा येथील रेस्टॉरन्टमध्ये बील भरण्यास सांगितल्याने काही बड्या लोकांनी हॉटेलच्या स्टाफला मारहाण केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांनी मारिया यांना फोन करून इशारा दिला होता की, आरोपींविरूद्ध खोटी तक्रार दाखल करण्यात आली असून या तक्रारीला जास्त महत्व देऊ नये.

मात्र, तरीसुद्धा मारिया यांच्या निर्देशानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून कथित बड्या लोकांना नोव्हेंबर 1999 मध्ये अटक केली होती. यामुळे मारिया यांची डिसेंबर 1999 मध्ये रेल्वे कमिश्नर पदावर बदली करण्यात आली होती. ही एक अशी पोस्टींग होती ज्यास डिमोशन मानले जाते. परंतु, नियमानुसार त्यांना नॉर्थ वेस्ट रिजनमध्ये कमीत कमी दोन वर्षे सेवा द्यायची होती. मात्र, अवघ्या 13 महीन्यात त्यांची बदली करण्यात आली.