ट्विटरवरील आपल्या ‘फेक’ अकाऊंटमुळं वैतागले TV वरील ‘राम’ अरूण गोविल, PM मोदीही ‘फसले’

पोलीसनामा ऑनलाईन :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला आवाहन केलं होतं की, त्यांनी रविवार दि 5 एप्रिल 2020 रोजी रात्री 9 वाजता 9 मिनिटांसाठी लाईट बंद करून दिवा, मेणबत्ती किंवा टॉर्च लाववी. याचं समर्थन करताना टीव्हीचे राम अरूण गोविल यांनी एक व्हिडीओ शेअर केला. जो त्यांच्या नावाच्या एका फेक अकाऊंटनं डाऊनलोड करून पोस्ट केला. पीएम मोदीही @RealArunGovil नावाच्या अकाऊंटला फसले. त्यांनी या युजरचं ट्विट हे अरूण गोविल यांचं आहे असं समजून त्यांचे आभार मानले.

पीएम मोदींनी लिहिलं की, “तुमचा हा संदेश कोरोनाच्या विरुद्ध सुरु असेलल्या लढाईच्या संकल्पाला आणखीही मजबूती देईल.” जेव्हा अरूण गोविल यांना याबाबत समजलं तेव्हा त्यांनी पीएम मोदींच्या ट्विटला रिप्लाय देत लिहलं की, खूप खूप धन्यवाद सर. माझं खरं ट्विटर हँडल 2arungovil12 नावानं आहे. गोविल यांच्या या ट्विटनंतर त्या फेक युजरनं गोविल यांचं ते ट्विट डिलीट केलं.

यानंतर गोविल यांनी एक व्हिडीओ शेअर केलं ज्यात त्यांनी सांगितलं की, कसं त्यांच्या नावानं कोणी बनावट अकाऊंट केलं आहे. त्यांनी चाहत्यांना विनंती केली की, त्यांनी त्या व्यक्तीला असं न करण्यासाठी सांगावं. सोबतच त्यांनी चाहत्यांना त्यांच्या खऱ्या युट्युब आणि इंस्टाग्राम अकाऊंटबद्दलही माहिती दिली.