राम गोपाल वर्मांचे अभिनयाच्या जगात पाऊल

मुबंई : पोलीसनामा ऑनलाईन – दिग्दर्शक राम गोपाल वर्मा हे आता अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहेत. अनेक सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन आणि निर्मिती केल्यानंतर राम गोपाल वर्मा आता अभिनयाकडे पाऊल टाकत आहेत. कोबरा या तेलुगु चित्रपटात ते सीबीआय ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. राम गोपल वर्मा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या अभिनय क्षेत्रातील पदार्पणाची माहिती दिली आहे.

राम गोपाल वर्मा हे ट्विटरवर नेहमीच सक्रिय असतात. त्यांचे अनेक चाहते त्यांना ट्विटरवर फॉलो करतात. त्यांनी आपल्या अभिनय क्षेत्रातील पदार्पणाची माहिती देताना ट्विट केले आहे. राम गोपाल वर्मा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “आज माझ्या वाढदिवसाचं निमित्त साधत मी माझ्या करिअरमध्ये पहिल्यांदाच अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. तुम्ही मला आशीर्वाद दिला नाही तरी मला फार काही फरक पडत नाही. धन्यवाद.” असं आपल्या खास शैलीत राम गोपाल वर्मा यांनी ट्विट केलं आहे.

दरम्यान राम गोपाल वर्मा अभिनय करत असलेला चित्रपट हा एका गँगस्टरच्या आयुष्यावर आधारीत आहे. 7 एप्रिल पासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यांचे चाहते त्यांना अभिनय करताना पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. शिवा या चित्रपटापासून राम गोपल वर्मा यांनी चित्रपटाच्या करिअरला सुरुवात केली होती. 1989 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

राम गोपाल वर्मा यांच्या सरकार या चित्रपटात प्रमुक भूमिका साकारणारे बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी राम गोपाल वर्मा यांनी केलेल्या ट्विटला उत्तर देत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “अखेर राम गोपाल वर्मा ‘द सरकार’ ला आपला खरा व्यवसाय(मार्ग) गवसला आहे आणि तो म्हणजे अॅक्टिंग. सरकार तुम्हाला खूप खूप शुभेच्छा… मला अजून एक प्रतिस्पर्धी” असे अमिताभ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.