कुंभमेळ्याच्या गर्दीवर दिग्दर्शक राम गोपाल वर्मांचे वक्तव्य, म्हणाले – ‘हिंदूंनी मुस्लिमांची माफी मागावी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने देश लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. अशात हरिद्वार येथे भरवलेल्या कुंभमेळ्याच्या गर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ज्यात सोशल डिस्टन्सिंगचे कोणतेही नियम पाळले जात नाहीत. यावर बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी नाराजी व्यक्त करत कठोर शब्दात टीका केली आहे. त्यांनी एका ट्वीटमध्ये कुंभ मेळ्याचा एक फोटो शेअर करून लिहले आहे की, तुम्ही जो पाहात आहात तो कुंभमेळा नाही तर एक ॲटम बॉम्ब आहे. मला उत्सुकता वाटतेय की, आता या व्हायरल एक्सप्लोजनसाठी कोणाला जबाबदार धरणार असे म्हणत त्यांनी नाराजी दर्शवली आहे.

राम गोपाल वर्मा यानी आणखी एक ट्विट करत टीका केली आहे. त्यात म्हटले आहे की, अभिनंदन इंडिया, लॉकडाऊनला आता नवीन नाव दिले आहे. ब्रेक द चेन व्वा, आणि सर्वांना या नामकरणाच्या कार्यक्रमात या सुचनेसह बोलावले आहे आहे की, कुंभ मेळ्यातून परतणाऱ्या लोकांनी मास्क नाही वापरला तरी चालेल कारण ते आपला व्हायरस आधीच गंगेत धुवून आले आहेत. तर वर्मा यांनी तिसऱ्या ट्वीटमध्ये गेल्या वर्षी दिल्लीत झालेल्या जमात वादाचे उदाहरण देत हिंदूंनी मुस्लीमांची माफी मागावी असे म्हटले आहे.

त्यात त्यांनी म्हटले आहे की, मार्च 2020 मध्ये कोरोनाला मोठ्या प्रमाणावर प्रसार करणारी दिल्लीतील जमात ही बाहुबली कुंभमेळ्याच्या समोर एका शॉर्ट फिल्मसारखी होती. सर्व हिंदूंनी मुस्लीमांची माफी मागावी. कारण त्यांनी हे सर्व कोरोनाची काहीही माहिती नव्हती त्यावेळी केले होेते. पण आपण हे अशावेळी करत आहोत जेंव्हा आपल्याला कोरोनाचे गंभीर परिणाम माहीत आहेत असे वर्मा यांनी म्हटले आहे.