आ. राम कदम यांची जयंत पाटलावर टीका, म्हणाले- ‘तुमच्या पक्षाच्या सर्वेसर्वांमध्ये इतर मतदार संघात उभे राहण्याची हिंमतही नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुण्यातल्या एका अतिशय चांगलं काम करणाऱ्या महिलेने तयार केलेला मतदारसंघ ताब्यात घेतला आणि तिथून निवडणूक लढवली हा पुरुषार्थ आहे का? असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला होता. यावरून भाजपा नेते आमदार राम कदम यांनी जयंत पाटील याच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. चंद्रकांत पाटील यांनी मारलेला बाण अचूक वर्मी बसलेला दिसतोय. म्हणूनच राष्ट्रवादीच्या प्रांताध्यक्षांनी इतकी उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील जे बोलले त्यातून एकच सिद्ध होते की चंद्रकांतदादा महाराष्ट्रातून कुठूनही निवडून येऊ शकतात. मात्र, जयंत पाटील यांच्या पक्षाच्या सर्वेसर्वामध्ये इतर मतदार संघात उभ राहण्याची हिंमत नसल्याची बोचरी टीका कदम यांनी केली आहे.

आम्ही कधीही व्यक्तीगत टीका करत नाही. परंतु जयंत पाटील यांनी आपल्याच वक्तव्यावरून महाराष्ट्राला सांगितले आहे की, चंद्रकांत पाटील महाराष्ट्रातील कोणत्याही मतदारसंघातून निवडून येतात. मात्र जयंत पाटील यांच्या बॉसना हे अजूनही जमत नाही. चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य त्यांच्या वर्मी लागलेले दिसत आहे. जयंत पाटील यांनी यापूर्वीही चंद्रकांतदादांचे वय काढलं, पण वय काही असले तर स्वत:च्या जीवाची पर्वा न करता ते गावोगावी कोरोना काळात फिरत होते. तुमचे सर्व मंत्री आणि सरकार वातानुकुलित असलेल्या बंगल्यात स्वत:च्या जीवाची चिंता करत बसले होते, हे अद्यापही महाराष्ट्र विसरला नसल्याचे आमदार कदम म्हणाले.