हिंदुत्वाच्या मुद्यावरून राम कदमांचा शिवसेनेला ‘खोचक’ टोला (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत जाणार असल्याचे शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी नुकतेच जाहीर केले. राज्य सरकारला शंभर दिवस झाल्यानंतर ते अयोध्येत जाणार असून ते श्रीरामाचे दर्शन घेऊन पुढील कार्यक्रमाची दिशा ठरवणार असल्याचे राऊत यांनी जाहीर केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी शिवसेनेवर खोचक टीका केली आहे.

राम कदम म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्येत श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी जाणार हे चांगले आहे. तसं तर ते अडीच महिन्यापूर्वीच अयोध्येत श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी जाणार होते. मात्र, सत्तेसाठी शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर पडला असल्याची टीका होऊ लागल्यानंतर उद्धव ठाकरे यांना श्रीरामाची आठवण झाली असल्याचा आरोप कदम यांनी केला आहे.

पुढे बोलताना राम कदम म्हणाले, शिवसेनेचं अयोध्या दौऱ्याचं टाईमिंग खूप महत्त्वाचे आहे. शिवसेना हिंदुत्व विसरली, सावरकरांवरील त्यांचे प्रेम कमी झाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्यानंतर त्यांनी माफी मागीतली नाही, अशी चर्चा सुरु झाल्यानंतर त्यांना श्रीरामाची आठवण येते, असा आरोप त्यांनी केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या दिवशी महाअधिवेशन घेतले. मनसे हिंदुत्वाच्या दिशेने वाटचाल करणार आहे. त्यामुळे मनसेच्या अधिवेशनाच्या अदल्या दिवशीच शिवसेनेला श्रीरामाची आठवण झाली असल्याचा खोचक टोला देखील राम कदम यांनी लगावला आहे.

फेसबुक पेज लाईक करा –