‘वादग्रस्त’ पुस्तकाचा ‘वाद’ थेट पोलिस ठाण्यात ! ‘या’ भाजप नेत्याची संजय राऊतांविरोधात ‘तक्रार’

मुंबई : पोलीसानामा ऑनलाइन – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत करण्यात आलेल्या ‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ या पुस्तकामुळे देशात आणि महाराष्ट्रात वादंग उठले. या पुस्तकावरून उफाळून आलेला वाद आता थेट पोलीस ठाण्यात जाऊन पोहचला आहे. मुंबईतल्या घाटकोपरमधील भाजपचे आमदार राम कदम यांनी संजय राऊत यांच्या विरोधात घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

राम कदम यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर ते पोलीस ठाण्यात ठिय्या मंडून बसले आहेत. जोपर्यंत संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरुच राहील असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे संजय राऊतांना पुन्हा एकदा अडचणीत आणण्याचा भाजपकडून प्रयत्न केला जात आहे. तर दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यात राऊत यांच्या फोटोला जोडेमारो आंदोलन करण्यात आले. तसेच संगमनेरमध्ये उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी राऊत यांच्या विरोधात निषेध नोंदवला आहे.

पुण्यातील एका कार्यक्रमात संजय राऊत यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर निशाणा साधत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सातारा, कोल्हापूरच्या गादीचा आम्ही आदर करतो. महाराजांचे नाव जिथे येते, तिथे आम्ही नतसमस्तक होतो. पण शिवाजी महाराज ही कोणाचीही मक्तेदारी नाही. स्वत:ला छत्रपतींचे वंशज म्हणविणाऱ्यांनी पुरावे द्यावेत असे आव्हान त्यांनी माजी खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले यांना दिले होते.

उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेवर टीका करताना ‘शिव’ शब्द काढून ठाकरेसेना असे नाव करा, असे म्हटले होते. यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, उदयनराजे काय बोलतात हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांना बोलण्याचा अधिकार आहे, ते माजी खासदार आहेत. ते विरोधी पक्षाची भूमिका मांडतात. शिवाजी महाराज हे युगपुरुष होते आणि आम्ही त्यांना दैवत मानतो. गणपती, विष्णूची पूजा करताना वशंज असावे लागत नाही, असा टोला त्यांनी लगावला होता.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/