अयोध्येत भव्यदिव्य गुरूकूल उभारणार : बाबा रामदेव

अयोध्या : पोलीसनामा ऑनलाइन – राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी अयोध्या नगरी सजली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडत असून अनेक मान्यवर उपस्थित राहिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. दरम्यान, राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्येत दाखल झालेल्या योगगुरू बाबा रामदेव यांनी मोठी घोषणा केली आहे.

बाबा रामदेव म्हणाले, राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा आपल्याला पहायला मिळतोय, हे आपल्या सगळ्याच सौभाग्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. देशात रामराज्य आणण्यासाठी पतंजली योगपीठ अयोध्येत भव्यदिव ‘गुरुकुल’ उभा करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. पतंजलीच्या गरुकुलात जगभरातून येणाऱ्या व्यक्ती वेद, आयुर्वेद यांचा अभ्यास करु शकतील. तसेच राम मंदिरासोबत देशात रामराज्य येणार असल्याचं त्यांनी म्हटलं.

आजचा दिवस हा ऐतिहासिक आहे. हा दिवस कायम सर्वांच्या लक्षात राहील. मला खात्री आहे की, राम मंदिरामुळे देशात ‘रामराज्य’ स्थापित होईल, असं बाबा रामदेव यांनी सांगितलं. पंतप्रधान यांच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी पूर्णपणे भगव्या रंगात सजली आहे. भूमिपूजनावेळी २२ किलो ६०० ग्राम वजनाची वीट ठेवून पाय रचला जाणार आहे. विटेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावासह जय श्रीराम लिहण्यात आले आहे. तसेच विटेवर राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त सुद्धा लिहण्यात आला आहे.