अयोध्येतून नव्या भारताची नवी सुरूवात होतेय : मोहन भागवत

अयोध्या : वृत्तसंस्था – राम मंदिराची उभारणी होत असताना लोकांचे बलिदान विसरता कामा नये, आजपासून भारताला वैभवशाली बनवण्याचे काम सुरु झाल्याच्या भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केल्या. २० ते २० वर्षे आम्ही काम केले त्यानंतर आज संकल्पपूर्तीचा आम्हाला आनंद मिळाल्याचं भागवत यांनी म्हटलं.

राम मंदिराच्या भूमिपूजनावेळी बोलताना भागवत म्हणाले, राम मंदिरासाठी अनेकांनी बलिदान दिल्याचे सांगत जेष्ठ भाजप नेते लालकृष्ण आडवाणी यांची त्यांनी आठवण काढली. आडवाणी आज घरात बसून सोहळा पाहत असतील, अनेक लोक आज उपस्थित नाहीत. देशात सगळीकडे आनंदाची लहर आहे. पण सर्वात मोठा आनंद आहे भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी ज्या आत्मविश्वासाची आणि आत्मभानाची गरज होती त्याचे अधिष्ठान बनण्याची आज सुरुवात झाली. आनंदात स्फुरण आणि प्रेरणा असल्याचं भागवत यांनी सांगितलं.

“विश्वात सर्वाधिक सज्जनतेचा व्यवहार होत आहे. सर्वांना सोबत घेत चालण्याचे अधिष्ठान आज अयोध्येत बनत आहे. परमवैभव संपन्न आणि सर्वांचे कल्याण करण्याचा शुभारंभ आज होत आहे. आता येथे भव्य मंदिर उभे राहील, ज्यांना जी जबाबदारी दिली ती पार पाडली जाईल. मंदिर निर्माण होण्यापूर्वी आता आमच्या मनात आम्हाला अयोध्या उभारण्याची आहे. सर्वांची उन्नती करणारा, सर्वाना आपले मानणारा धर्म आणि जगातील सर्वाना सुखशांती देणारा भारत आम्हाला उभा करायचं आहे, असे मोहन भागवत म्हणाले.

तर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं, प्रश्न किंवा प्रकरणांची सोडवणूक घटनात्मक मार्गांनी, लोकशाहीच्या मार्गाने आणि शांतीपूर्ण मार्गाने कशी केली जाते हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाने भारताच्या लोकशाहीची मूल्ये आणि देशातल्या न्याय व्यवस्थेने जगाला दाखवून दिलं आहे.